शुभ वार्ता; युद्ध थांबण्याची शक्यता? होर्मुझबाबत इराणचा नवा प्रस्ताव चर्चेत !

0
29
Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

जागतिक स्तरावर तणाव निर्माण करणाऱ्या अमेरिका-इराण संघर्षात आता काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात इराणने एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला असून, त्यावर सध्या चर्चा सुरू आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास जलवाहतूक पुन्हा सुरळीत होण्याची आणि तणाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेसोबत झालेल्या चर्चेनंतर इराणने असा प्रस्ताव दिला आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील ओमानच्या सागरी हद्दीतून जहाजांना कोणत्याही हल्ल्याच्या भीतीशिवाय मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. या निर्णयामागे नव्या युद्धाला आळा घालण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा तात्पुरता युद्धविराम लागू आहे. मात्र, सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याच्या अटीवर हा युद्धविराम झाला असला तरी अद्याप जलवाहतूक पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे या प्रस्तावावर अमेरिकेची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी ही इराण आणि ओमान दरम्यान असलेली अतिशय महत्त्वाची जलवाहिनी आहे. जगातील सुमारे 20 टक्के तेलवाहतूक या मार्गाने होते. त्यामुळे येथे निर्माण होणाऱ्या तणावाचा थेट परिणाम भारतासह अनेक देशांवर होतो.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांकडून मोठ्या प्रमाणात टोल वसुली सुरू केली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय दबाव आणि चर्चांनंतर आता इराणची भूमिका काहीशी मवाळ झाल्याचे दिसत आहे. ओमानने आधीच या मार्गावर कोणताही टोल आकारू नये अशी भूमिका घेतली होती.

संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनेही (IMO) टोल वसुलीच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर इराणचा नवीन प्रस्ताव हा तणाव कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

आता अमेरिका हा प्रस्ताव स्वीकारते का, आणि त्यानंतर होर्मुझमधील जलवाहतूक पूर्णपणे सुरळीत होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here