Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

राज्यातील सर्व पोलिस अधिकारी आणि अंमलदारांसाठी दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. हेल्मेट न घातल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, त्यांच्या सेवापुस्तिकेतही नोंद केली जाणार आहे. असे आदेश राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी जारी केले आहेत.

पोलिस दलातच हेल्मेट वापराचे प्रमाण अत्यंत कमी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबई आणि नागपूर वगळता इतर शहरांमध्ये २० टक्क्यांपेक्षाही कमी पोलिस हेल्मेट वापरत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

३ एप्रिल रोजी नागपूर येथे झालेल्या बैठकीत महासंचालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. नागरिकांनी नियम पाळावेत यासाठी आधी पोलिसांनीच आदर्श निर्माण करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

या आदेशानंतर राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी संबंधित परिपत्रक जारी केले आहे.

वाहतूक कायद्यानुसार (कलम १९४ डी) प्रत्येक दुचाकीस्वारासाठी हेल्मेट सक्तीचे आहे. आता हा नियम पोलिसांसाठी अधिक कठोरपणे लागू करण्यात आला आहे.

नियम मोडल्यास कडक कारवाई:

विनाहेल्मेट आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारला जाईल.
संबंधित पोलिसाने जाणीवपूर्वक नियम मोडल्याचे गृहीत धरून त्याची नोंद सेवापुस्तिकेत केली जाईल.
या नोंदीचा परिणाम भविष्यातील पदोन्नती व सन्मानांवर होऊ शकतो.
सोशल मीडियावर विनाहेल्मेट फोटो व्हायरल झाल्यासही कारवाई होणार.

अपघातांचे चिंताजनक आकडे:
राज्यातील अपघातांच्या आकडेवारीनुसार, मागील दशकात सुमारे ४० टक्के प्राणघातक अपघात दुचाकीस्वारांशी संबंधित आहेत.

२०२४ मध्ये ५,८१४ अपघात; ३,१६९ मृत्यू
२०२५ मध्ये ५,६४८ अपघात; ३,०२० मृत्यू
जानेवारी २०२६ मध्ये ५२५ अपघात; २८४ मृत्यू

या पार्श्वभूमीवर हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here