प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
सोशल मीडियावरून कोणाच्याही बदनामीचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.
विधानसभेत राहुल कुल यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून होणाऱ्या बदनामीच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय व्यक्तींची बदनामी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
फडणवीस म्हणाले, या प्रकारांमुळे समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः महिलांना सोशल मीडियावरील बदनामी आणि ट्रोलिंगचा जास्त सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया आणि ऑनलाइन बदनामीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्यात काही बदल किंवा नवीन तरतुदी करता येतील का, याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकार समिती स्थापन करणार आहे. राज्याचे डीजी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
ही समिती सोशल मीडियावरील बदनामीच्या प्रकरणांचा अभ्यास करून आवश्यक शिफारसी सरकारला सादर करेल. त्या शिफारसींनुसार पुढील कायदेशीर कारवाई आणि धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यात सोशल मीडिया आणि ऑनलाइन बदनामीच्या प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून उचलले जाणारे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.






