प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करताना दिव्यांग प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा गैरवापर रोखण्यासाठी एसटी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. बनावट वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडी) वापरून सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची आता थेट बसमध्येच पडताळणी केली जाणार आहे. यासाठी एसटीतील सर्व वाहक, पर्यवेक्षक आणि तपासणी कर्मचाऱ्यांच्या मोबाइलमध्ये यूडीआयडी पडताळणीसाठी विशेष ॲप डाऊनलोड करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये या विशेष ॲपचा वापर अनिवार्य करण्यात आला असून, यामाध्यमातून यूडीआयडी कार्डची वैधता ऑनलाइन पद्धतीने तत्काळ तपासली जाणार आहे. कार्डवरील क्रमांक, जन्मतारीख आणि इतर तपशीलांची त्वरित पडताळणी होणार असून, कार्ड वैध असल्यासच मोफत किंवा सवलतीच्या प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे.
प्रवासादरम्यान अवैध, बनावट किंवा संशयास्पद ओळखपत्र आढळल्यास ते तत्काळ जप्त करण्यात येईल. संबंधित प्रवाशावर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम २१ नुसार थेट गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
एसटीच्या तपासणी पथकांकडून धावत्या बसमध्येही तपासणी केली जाणार आहे. कोणत्याही थांब्यावरून तपासणी निरीक्षक बसमध्ये प्रवेश करून दिव्यांग प्रवाशांच्या ओळखपत्रांची खातरजमा करणार आहेत. त्यामुळे बोगस दिव्यांग प्रवाशांना आता सवलतीचा गैरफायदा घेणे कठीण होणार आहे.
एसटी बसमधून प्रवास करताना दिव्यांग प्रवाशांना मोफत किंवा सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. मात्र, सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी बनावट अपंग ओळखपत्रे काढल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पात्र दिव्यांग प्रवाशांना अडचणी येत असून एसटी महामंडळालाही आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
“प्रवासात सवलती घेण्यासाठी बोगस दिव्यांग ओळखपत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे आढळून आले आहे. तपासणी मोहिमेमुळे हा गैरप्रकार थांबेल आणि महामंडळाचा आर्थिक तोटाही रोखता येईल,” असे पुणे विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.





