Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

होर्मुज खाडीत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणमध्ये अटकेत असलेल्या १० भारतीय खलाशांची अखेर सुरक्षित सुटका करण्यात आली असून, भारत सरकारच्या सातत्यपूर्ण राजनैतिक प्रयत्नांना यश मिळाल्याचे मानले जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून होर्मुज खाडीतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. इराण-अमेरिका संघर्षामुळे या महत्त्वाच्या सागरी मार्गावरील जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. अनेक व्यापारी जहाजांवर हल्ल्यांच्या घटना घडल्या असून, भारतीय जहाजांनाही त्याचा फटका बसला होता.

भारतीय नौवहन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, हे खलाशी ‘एमव्ही हार्बर फिनिक्स’ या तेलवाहू जहाजावर कार्यरत होते. जुलै २०२५ मध्ये इराणच्या बंदराजवळ हे जहाज अडवण्यात आले होते. त्यानंतर जहाजावरील भारतीय खलाशांना ताब्यात घेण्यात आले होते.

या घटनेनंतर भारत सरकारने शांतपणे आणि सातत्याने इराणशी राजनैतिक स्तरावर चर्चा सुरू ठेवली. दीर्घ वाटाघाटीनंतर अखेर खलाशांची सुरक्षित सुटका करण्यात यश आले. नौवहन महासंचालनालयाने जारी केलेल्या निवेदनात खलाशांची सुटका झाल्याची पुष्टी करत त्यांना भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

दरम्यान, होर्मुज खाडीत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठांवरही परिणाम झाला आहे. तेलपुरवठा आणि सागरी व्यापारावर संकट निर्माण झाले असून, अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. भारताने या संघर्षात संतुलित आणि सावध भूमिका घेत भारतीय जहाजांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here