कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील सवत कडा पर्यटनस्थळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत युसूफ मेहबूब शेख यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळावरील सुरक्षा व्यवस्था, प्रवेश शुल्क, महसूल, रस्ता, वृक्षतोड आणि पर्यटन विकासकामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या सर्व बाबींची कागदोपत्री व पारदर्शक माहिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करत महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते डॉ. युवराज रामचंद्र येडूरे यांनी संबंधित प्रशासनाला ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन दिले आहे.
सवत कडा येथे आकारण्यात येणाऱ्या प्रवेश शुल्काचा संपूर्ण हिशेब जाहीर करावा, तसेच जमा झालेल्या महसुलापैकी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किती निधी खर्च करण्यात आला, याची माहिती द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.पर्यटनस्थळी सुरक्षा व्यवस्था, प्रथमोपचार आणि आपत्कालीन बचाव यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच रस्ता व इतर विकासकामांच्या प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरीची तपासणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच वनजमिनीच्या वापराबाबत आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, वृक्षतोड झाली असल्यास त्यासंबंधीच्या परवानग्या, पंचनामे व अधिकृत नोंदी तपासाव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सवत कडा पर्यटनस्थळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी नेमकी कोणत्या विभागाची आहे, हे स्पष्ट करावे. तसेच युसूफ मेहबूब शेख यांच्या मृत्यूची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने ठोस सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डॉ. येडूरे यांनी केली आहे.
“आमचा पर्यटन विकासाला विरोध नाही. पर्यटन वाढले पाहिजे, रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि स्थानिकांचा विकास झाला पाहिजे. मात्र पर्यटन विकास कायद्याच्या चौकटीत आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेची हमी देऊनच झाला पाहिजे. नियम सर्वांसाठी समान असावेत आणि पर्यटनातून मिळणाऱ्या महसुलाचा हिशेब जनतेला मिळालाच पाहिजे. जनतेच्या जीवाची किंमत कोणत्याही विकासापेक्षा मोठी आहे,” अशी भूमिका डॉ. येडूरे यांनी व्यक्त केली.






