नृसिंहवाडी दक्षिणद्वार सोहळा : हजारो भाविकांनी घेतला स्नानपर्वणीचा लाभ.

0
229
The first Ascension Dakshindwar ceremony of this season was held on Wednesday at the Shri Datta Temple in Nrusinghwadi.
Google search engine

अनिल जासुद : कुरुंदवाड

महाराष्ट्रासह कर्नाटक,गोवा मधील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात या मोसमातला पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा बुधवारी दुपारी एक वाजता पार पडला. यावेळी हजारो श्री दत्त भाविक भक्तांनी दत्त नामाचा गजर करीत दक्षिणद्वार सोहळ्यात पुण्यस्नान पर्वणीचा लाभ घेतला.

दरम्यान, गेल्याच आठवठ्यात म्हणजे १७ व २२ जूनला कृष्णेचे पाणी मंदिराच्या गाभार्‍यापर्यंत येऊन परत फिरले होते. यामुळे अपेक्षित असलेल्या दक्षिणद्वार सोहळ्याने हुलकावणी दिली होती. बुधवारी दुपारी दक्षिणद्वार सोहळा होऊ शकतो याची सोशल मिडीया, मोबाईलवरुन, प्रसारमाध्यमावरुन माहिती मिळाल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव, मुंबई, पुणे आदी जिल्ह्यातून हजांरो भाविक नृसिंहवाडीत आले होते.

बुधवारी दुपारी एक वाजता कृष्णामाईने श्री दत्तप्रभुंच्या चरण स्पर्श करुन आपल्या संथ वाहणार्‍या धारेने अभिषेक घालून दक्षिणद्वार सोहळा पुर्ण केला. या पवित्र सोहळ्यात महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतील हजांरो श्री दत्त भाविक भक्तानी स्नान करुन पवित्र पुण्यस्नान पर्वणीचा लाभ घेतला. दक्षिणद्वार सोहळ्यानिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन श्री दत्त देवस्थान समितीने सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना सज्ज ठेवल्या होत्या. यामुळे या मोसमातला पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत अतिशय भक्तीमय वातावरणात श्री दत्त नामाचा गजर करीत पार पडला.

दक्षिणद्वार सोहळा दुपारी एक वाजता झाला असला तरी सांयकाळी उशिरापर्यंत हजारो भाविक स्नानपर्वणीचा लाभ घेत होते. दरम्यान, शिरोळ तालुक्यात बुधवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली असली तरी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मात्र दिवसभरात पाच फुटाने वाढ झाली आहे.

राजापूर धरणांजवळ बुधवारी सकाळी ८ वाजता पाणी पातळी २९ फूट ५ इंच होती. ती गुरुवारी सकाळी ८ वाजता ३३ फूट ५ इंचावर गेली. कृष्णा – पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. औरवाड- नृसिंहवाडी दरम्यानचा जुना पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच कृष्णानदी पलीकडील गौरवाडसह औरवाड, आलास, बुबनाळ, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी या सात गावातील नदीकाठांवरील शेकडो एकर गवत कुरणे पाण्याखाली गेली आहेत. कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सतत चढ-उतार होत असून गेल्या दहा दिवसापासून गौरवाडसह सात गावाभोवती पुराचा वेढा मात्र कायम राहीला आहे.

—————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here