कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक क्षेत्रातील दीपस्तंभ

0
976
Google search engine

शैक्षणिक क्षेत्रातील दीपस्तंभ, बहुजन समाज सुशिक्षित होण्यासाठी झटणारे, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील तथा अण्णा यांचा आज ९ मे स्मृती दिन. यानिमित्त…

आण्णांनी कडेगावात शाळा सुरु केली मात्र विद्यार्थी कुठे होते. त्यांनी घरोघरी जाऊन, मुलांच्या आई-बाबांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन, कधी कधी शेतात गेलेल्या मुलांना खांद्यावरून शाळेत आणले. अशा पद्धतीने शाळा सुरु केल्या. आण्णांना असं कर असं कुणी सांगितल नव्हतं आणि कोण पैसेही देत नव्हतं. पण कर्मवीर आण्णांचा एकच ध्यास होता. बहुजन समाज शिकला पाहिजे, शहाणा झाला पाहिजे, प्रगत झाला पाहिजे!

जेव्हा समाजाला शिक्षण महत्त्वाचे वाटत नव्हते तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण संस्था स्थापन केली. ज्या ठिकाणी कोणतेही वाहन जात नाही अशा ठिकाणी त्यांनी शाळा सुरु केल्या. या शाळेत सर्व धर्मांच्या, सर्व जातीच्या मुलांना आणि मुलीना प्रवेश होता. विशेष म्हणजे कर्मवीर आण्णांनी नेमलेले शिक्षकही ध्येयसक्त होते. त्यांनीही विद्यार्थ्यांवर मायेची पाखर घालून शिकवले.

भाऊराव पाटील यांनी १९१९ साली काले [जि. सातारा] येथे ‘रयत शिक्षण संस्था’ ही संस्था स्थापन केली. पहिली शाळा सातारा जिल्ह्यातील कडेगाव येथे १९१९ साली सुरु केली. ही शाळा ‘रायगड बोर्डिंग’ या नावाने ओळखली जायची. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, दलित, शेतकरी आणि वंचित वर्गातील लोकांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला करून दिला.

कर्मवीर भाऊराव पाटील यांना छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून मिळालेली प्रेरणा ही त्यांच्या सामाजिक कार्याचे मुळ होते. छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक समतेचे विचार, शिक्षणप्रेम आणि गरिबांसाठी कार्य करण्याची तळमळ यानेच कर्मवीर भाऊराव पाटील यांना खोलवर प्रभावित केले आणि त्यांना समाजसेवेच्या वाटेवर चालण्याची प्रेरणा दिली. कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक महान समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कार्यकर्ते होते. त्यांनी गरीब, शेतकरी आणि वंचित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून संपूर्ण आयुष्य वेचले.

मुलं शाळेत का येत नाहीत याचे नेमकं कारण कर्मवीर आण्णांना समजले. मुले शाळेत येण्यासाठी पालकांना विनवणी करताना पालक म्हणायचे, ‘पोराला शाळेत नेल्यावर आमची शेती कोण करायची? आमची गुरं कोण साभाळायची? मुलाला खायला काय घालायचे?’ यावर आण्णांनी उपाय शोधला. कमवा आणि शिका योजना आण्णांनी सुरु केली. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले. विद्यार्थी दिवसा काम करत आणि रात्री शिक्षण घेत असत. ही योजना समाजातील अनेक घटकांसाठी शिक्षणाचं दार उघडणारी ठरली. आण्णा समाजातील दानशूर व्यक्तीकडून शाळा, महाविद्यालय उभारण्यासाठी जमिनी घेत त्या जागेवर बांधकामाचे किवा शेतीचे काम विद्यार्थ्याना उपलब्ध करून देत असत. या योजेमुळे विद्यार्थ्यांच्यावर श्रमसंस्कार व्हायचे. शिक्षणसंस्कार आणि श्रमसंस्कार विद्यार्थ्यांच्यावर झाल्यामुळे ते भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपायचे.

कर्मवीर आण्णांनी काळाची पावले ओळखून ५७८ प्राथमिक शाळा,  ४३९ माध्यमिक शाळा (त्यापैकी २७ मुलींसाठी), ३८ वसतिगृह शाळा, १६० उच्च माध्यमिक विद्यालये, १७ शेती विद्यालये, २१ तंत्रज्ञान विद्यालये, ८ अध्यापक महाविद्यालये (त्यापैकी १ महिलांसाठी), ४१ महाविद्यालये (त्यापैकी ४ मुलींसाठी), ५ इंग्रजी माध्यम विद्यालये सुरु केली. त्यांच्या हयातीत रयत शिक्षण संस्थेचा विस्तार महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये झाला.

भाऊराव पाटील स्वतः अत्यंत साध्या जीवनशैलीत वावरत होते. त्यांचे आचरण, विचार आणि कार्य हे तरुणांसाठी आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन सर्वांना समान संधी देण्यावर भर दिला. अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेचा त्यांनी तीव्र विरोध केला. कर्मवीर भाऊराव पाटील हे एक प्रेरणास्त्रोत व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा मार्ग दाखवला. आजही त्यांच्या कार्याचा ठसा महाराष्ट्रातील ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत पहायला मिळतो. कर्मवीर आण्णांचे  शैक्षणिक कार्य हे समाज परिवर्तनाचं एक प्रभावी साधन ठरलं. त्यांनी “शिक्षण हक्काचं आणि सगळ्यांचं असावं” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. त्यामुळे ते आजही एक ‘कर्मवीर’ म्हणून ओळखले जातात.

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य शैक्षणिक क्षेत्रातील दीपस्तंभ आहे. शंभर वर्षापूर्वी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रयोग केले. व्यवसाय शिक्षणाच्या विद्या शाखा सुरु केल्या. केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरण आणले. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कर्मवीर आण्णांच्या विचारांचा प्रभाव असावा. शैक्षणिक संस्था या राजकीय प्रभावापासून मुक्त असाव्यात. तरच कर्मवीर आण्णांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल.

—————————————————————————————

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here