भारतीय अंतराळवीर आज यशस्वीपणे परतणार

0
303
Google search engine

 नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

भारताने ४१ वर्षांनंतर अंतराळात पाठविलेला अंतराळवीर आज यशस्वीपणे पृथ्वीवर परतणार आहे. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे अ‍ॅक्सिओम-4 (Axiom-4) ही मोहिम पूर्ण करून आज पृथ्वीवर परतणार आहेत. अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि अ‍ॅक्सिओम स्पेस यांच्या सहकार्याने स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटमधून २५ जून रोजी ही मोहिम फ्लोरिडामधून प्रक्षेपित करण्यात आली होती.

अंतराळात १७ दिवस 
२६ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) पोहोचलेले शुभांशू आणि त्यांचे तीन सहकारी १४ दिवसांच्या नियोजित मोहिमेनंतर चार दिवस उशिराने म्हणजे आज परत येत आहेत. या कालावधीत त्यांनी शास्त्रीय प्रयोग, शैक्षणिक उपक्रम, आणि निरीक्षणे केली आहेत.
भारतासाठी ऐतिहासिक टप्पा
ही मोहिम खासगी असून भारत सरकारने शुभांशू यांच्या जागेसाठी ५४८ कोटी रुपये दिले आहेत. या मोहिमेतील ७ भारतीय प्रयोग आणि ५ नासाच्या सहकार्याने केलेले प्रयोग भारताच्या गगनयान मानव मोहिमेसाठी अत्यंत मोलाचे ठरणार आहेत. या प्रयोगांमध्ये जैविक अभ्यास, अंतराळातील मानवी आरोग्य आणि दीर्घकालीन प्रवासाच्या तयारीशी संबंधित घटकांचा समावेश होता.
मोदींशी संवाद : “अवकाशातून सीमा दिसत नाहीत”
२८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभांशू यांच्याशी व्हिडिओ कॉल केला होता. त्यावेळी शुक्ला म्हणाले, “अवकाशातून कोणत्याही सीमा दिसत नाहीत. संपूर्ण पृथ्वी एकसंध वाटते.” भारत पृथ्वीवरून अत्यंत भव्य दिसतो, असाही त्यांनी उल्लेख केला.
“सारे जहाँ से अच्छा…” पुन्हा अवकाशात
१३ जुलै रोजी झालेल्या निरोप समारंभात शुभांशू यांनी राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक संवादाची पुनरावृत्ती करत सांगितले, “सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा.” त्यांनी अंतराळातील अनुभवांविषयी सांगताना म्हटलं, “या प्रवासाचा अनुभव अविश्वसनीय होता. आमच्या टीमशिवाय हे शक्य झालं नसतं. जेव्हा वेळ मिळाला, तेव्हा आम्ही खिडकीतून पृथ्वीचं सौंदर्य पाहिलं – जे शब्दात सांगता येणार नाही.”
राकेश शर्मा, शुभांशू  यांचा अनुभव
राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या मोहिमेतून अंतराळप्रवास केला होता. त्यानंतर ४१ वर्षांनी भारताने पुन्हा एक अंतराळवीर अंतराळात पाठवला आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीमेसाठी (गगनयान) शुभांशू यांचा अनुभव एक महत्वपूर्ण शिडी ठरेल. शुभांशू शुक्ला यांचे पृथ्वीवर परतणे ही केवळ एक वैज्ञानिक घटना नसून, भारताच्या अंतराळ प्रगतीचे आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे प्रतीक ठरले आहे.

—————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here