दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्याबरोबरच गुणवंत दूध उत्पादकांचा सन्मान करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने यंदाही ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २१ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणार असून, गोकुळशी संलग्न सर्व दूध उत्पादकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी म्हशीने किमान १२ लिटर, तर गायीने किमान २० लिटर प्रतिदिन दूध देणे आवश्यक आहे. इच्छुक उत्पादकांनी संबंधित दूध संस्थेच्या लेटरहेडवर चेअरमन किंवा सचिव यांच्या सही व शिक्क्यासह अर्ज करून १२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत नोंदणी करावी. बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ आणि ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयांत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
स्पर्धेत म्हैस आणि गाय या दोन्ही गटांत प्रत्येकी तीन विजेत्यांची निवड केली जाणार आहे. म्हशीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ३५ हजार, ३० हजार आणि २५ हजार रुपये, तर गायीच्या गटात अनुक्रमे २५ हजार, २० हजार आणि १५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. विजेत्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन ‘गोकुळ श्री’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या अटी व नियमांची सविस्तर माहिती प्राथमिक दूध संस्थांना परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दूध उत्पादकांना अधिक दूध उत्पादनासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे हा या स्पर्धेचा उद्देश असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन गोकुळच्या वतीने करण्यात आले आहे.






