कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या ‘मी एक भाग्यवान’ या पुस्तकाचे प्रकाशन विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते कसबा बावडा येथील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या सभागृहात झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व व्याख्याते डॉ. यशवंत पाटणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ. भोसले यांनी आपल्या कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध केले असून, ते खऱ्या अर्थाने भाग्यवान आहेत. जीवनात शिक्षक आणि मदत करणारी माणसेच आपले खरे शिल्पकार असतात. आपल्या प्रगतीत योगदान देणाऱ्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना त्यांच्या ‘मी एक भाग्यवान’ या पुस्तकातून दिसून येते. हे पुस्तक उत्तम व्यक्तिचरित्रात्मक आत्मचरित्र असल्याचे गौरवोद्गार डॉ. यशवंत पाटणे यांनी काढले.
जीवनात केवळ गुणांच्या टक्केवारीवरून माणसाची गुणवत्ता ठरत नाही, तर संघर्षातून मिळालेला अनुभव माणसाला समृद्ध करतो. कष्टाने अडथळ्यांवर मात केल्यानंतरच खऱ्या अर्थाने भाग्य उजळते, असेही डॉ. पाटणे यांनी सांगितले.
शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. भगवान हिर्डेकर यांनी डॉ. भोसले यांच्या कार्याचा गौरव केला. सलग २१ वर्षे कुलसचिवपदाची जबाबदारी सांभाळणारा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असून, आयुष्य घडवणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची नोंद या पुस्तकातून घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले. दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांनीही पुस्तकाचे कौतुक करताना, माणूस कुठून आला यापेक्षा तो आयुष्यात कुठे पोहोचला, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. व्ही. व्ही. भोसले म्हणाले, एका गावातून अनेक अडचणींवर मात करत शिक्षण पूर्ण करण्यापासून ते शिवाजी विद्यापीठातील सांख्यिकी सहाय्यक पदापासून डी. वाय. पाटील विद्यापीठात सलग २१ वर्षे कुलसचिव म्हणून काम करण्यापर्यंतचा प्रवास अनेक देवदूतांसारख्या माणसांच्या सहकार्यामुळे शक्य झाला. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच ‘मी एक भाग्यवान’ हे पुस्तक लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला डी. वाय. पाटील विद्यापीठ नवी मुंबईचे माजी कुलपती डॉ. बी. पी. साबळे, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. भगवान हिर्डेकर, डॉ. अमर आडके, कुसुम व्ही. भोसले यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, कुटुंबीय व मित्रपरिवार उपस्थित होते. प्रास्ताविक कामाक्षी भोसले-शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. अनिल खटावकर यांनी मानले.






