पुसद : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना अंतर्गत कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) निधी प्रभावीपणे उपलब्ध करून घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी, पुसद यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या CSR समितीवर महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. युवराज रामचंद्र येडुरे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार ही समिती स्थापन करण्यात आली असून, विविध कॉर्पोरेट कंपन्यांकडून CSR निधी प्राप्त करून मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक नियोजन, समन्वय व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.
सामाजिक क्षेत्रातील दीर्घकालीन कार्य, स्वयंसेवी संस्थांना CSR निधी मिळवून देण्यासाठी केलेले मार्गदर्शन, तसेच महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून राज्यभर उभारलेले स्वयंसेवी संस्थांचे जाळे याची दखल घेत शासनाने डॉ. युवराज येडुरे यांची या महत्त्वाच्या समितीवर नियुक्ती केली आहे.
डॉ. येडुरे यांनी या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग तसेच उपविभागीय अधिकारी, पुसद यांचे आभार व्यक्त करत, शासन, उद्योग क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्था यांच्यात प्रभावी समन्वय साधून अधिकाधिक CSR निधी समाजहिताच्या विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, असा विश्वास व्यक्त केला.
या नियुक्तीमुळे CSR क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामीण विकासासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना निश्चितच अधिक बळ मिळेल, अशी भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.






