
मुंबई : विशेष प्रतिनिधी
मुंबईमध्ये विविध खाजगी अँप द्वारे अनधिकृत बाईक टॅक्सी चालवल्या जात आहेत. या बाईक टॅक्सी साठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही. बाईक टॅक्सी चालवण्याचे आमचे धोरण आहे. मात्र, त्यासाठी ई बाईकच असणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या रॅपिडोसारख्या टॅक्सी बाईकवर कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
टॅक्सी बाईकस्वार परवानगी नसताना प्रवासी वाहतूक करत असल्याचे समोर आल्यानंतर या टॅक्सी बाईकना परवानगी दिलेल्या अधिकाऱ्यांना खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच असे यावेळी सरनाईक यांनी सांगितले. सार्वजनिक मंडळांना नियमावलीच्या आधारे प्रवासी वाहतूक करणे गरजेचे आहे.
टॅक्सी बाइकबाबतचे प्रकरण नक्की काय ?
शासनानं नुकतंच ई-बाईक धोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार विविध अटी -शर्तीचं पालन करणाऱ्या व केवळ इलेक्ट्रिक बाईक असलेल्या संस्थांना यापुढं बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळं सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाईक टॅक्सी या अनधिकृत आहेत.
परिवहन मंत्र्यांनी बुक केली रॅपिडो बाईक
या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला याबाबत विचारलं असता, “मुंबई अथवा इतर शहरांमध्ये कोणतीही अनधिकृत बाईक टॅक्सी अँप अस्तित्वात नाही. असं सरकारी उत्तर मिळाले.” तथापि , त्याची उलट तपासणी करण्याच्या हेतूने मंत्री सरनाईक यांनी रॅपिडो बाईक टॅक्सी अँपवर स्वतः अनोळखी नावाने बाईक बुक केली. पुढच्या दहा मिनिटांमध्ये सदर बाईक त्यांना घेऊन जाण्यासाठी मंत्रालयातील शहीद बाबू गेनू चौकामध्ये हजर झाली. अशाप्रकारे अनधिकृतरित्या बाईक अँप चालवणाऱ्या संस्थेचा भांडाफोड स्वतः परिवहन मंत्र्यांनी केला होता.
आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात. त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून २०० एसटी वाढवण्यात येणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. भाविकांना पंढरपूरपर्यंत प्रवास करण्यास गैरसोय होऊ नये याची काळजी राज्य परिवहन मंडळ घेत असल्याचे नाईक यांनी सांगितले.
——————————————————————————————




