गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिका सज्ज; अडीच हजारांहून अधिक कर्मचारी तैनात..

0
67
Google search engine

कोल्हापूर : शहरातील घरगुती गौरी-गणपती विसर्जन सुरळीत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी कोल्हापूर महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या प्रमुख उपस्थितीत विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. विसर्जन मिरवणूक आणि विविध ठिकाणच्या व्यवस्थेसाठी अडीच हजारांहून अधिक महापालिका कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

गणेशमूर्ती संकलन आणि विसर्जनासाठी महापालिकेने ३०१ टेम्पो, १३०० हमाल, ७ जेसीबी, ७ डंपर, ८ ट्रॅक्टर आणि ४ पाण्याचे टँकर सज्ज ठेवले आहेत. यासोबतच २ बूम, ५ रुग्णवाहिका, ५ साधे तराफे, १० फ्लोटिंग तराफे आणि २ क्रेन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

गुरुवारी इराणी खण येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमन दलाची पथके, पुरेशा प्रकाशाची व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येत आहेत.
पंचगंगा नदी आणि शहरातील तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रभागांमध्ये १६० कृत्रिम विसर्जन कुंड आणि निर्माल्य कुंड उभारण्यात येत आहेत. नागरिकांनी शक्यतो या कृत्रिम कुंडांचा वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

विसर्जनाच्या काळात आरोग्य व्यवस्थेवरही विशेष लक्ष देण्यात आले असून, आरोग्य विभागाचे २३ आरोग्य निरीक्षक आणि स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. संकलित निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यासाठी सेवाभावी संस्थांच्या सुमारे १५० महिला सदस्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, नागेंद्र मुतकेकर, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, डॉ. विजय पाटील, संजय सरनाईक, राम काटकर, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, मिलिंद जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सहायक अभियंता अमित दळवी यांच्यासह विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांनी गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करून कृत्रिम विसर्जन कुंडांचा वापर करावा आणि विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here