कोल्हापूर : क्षयरोग (टीबी) आणि टीबीमुळे होणाऱ्या मेंदूज्वराचे जलद, अचूक आणि कमी खर्चात निदान करण्यासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने महत्त्वपूर्ण संशोधन हाती घेतले आहे.
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. दीपक व्ही. सावंत यांच्या पेपर बेस्ड टीबी निदान संशोधन प्रकल्पाला बीआयआरएसीकडून ५८.५१६ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
या संशोधनातून कमी खर्चात, कमी साधनसामग्रीत आणि तुलनेने कमी वेळेत टीबीचे निदान करता येईल अशी कागदावर आधारित प्रणाली विकसित केली जाणार आहे. विशेषतः प्रयोगशाळा आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मर्यादित असलेल्या भागांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पात येनपोया मेडिकल कॉलेज, मंगळुरू आणि एआयआयएमएस, नागपूर यांचाही सहभाग आहे. या संशोधनामुळे टीबीचे लवकर निदान आणि उपचार सुरू करण्यास मदत होऊन ‘टीबीमुक्त भारत’च्या उद्दिष्टाला बळ मिळेल, असा विश्वास डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.
या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी डॉ. सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.






