प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
प. पू. श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज (पूर्वाश्रमीचे योगेश्वरचंद्र चक्रवर्ती) हे शक्तिपात योग परंपरेतील एक महान विभूती होते. त्यांच्या जीवनाचा आणि त्यांचे प्रिय शिष्य प. पू. गुळवणी महाराजांशी असलेल्या संबंध आपण आज जाणून घेऊ
प. पू. श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज यांचा संक्षिप्त परिचय
-
जन्म: शके १८१४ (सन १८९२), वैशाख शुद्ध १२, रविवार (हस्त नक्षत्र).
-
जन्मस्थान: ढाका (सध्याचे बांगलादेश). तेथील प्रसिद्ध ‘ढाकेश्वरी’ देवीच्या मंदिरातील वंशपरंपरागत पुजारी असलेल्या ‘चक्रवर्ती’ घराण्यात त्यांचा जन्म झाला.

-
पूर्वाश्रमीचे नाव: योगेश्वरचंद्र चक्रवर्ती.
योगेशचंद्र यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी सन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर त्यांचे नाव ‘स्वामी श्रीचिन्मयानंद सरस्वती’ असे झाले. यानंतर प.प. स्वामी महाराजांनी हिमालयात टिहरी-गढवाल च्या जंगलात सलग दोन वर्ष कठोर साधना केली. त्यांची साधना पूर्ण सिध्द झाल्याने साक्षात महाकाली जगदंबेने त्यांना दक्षिणेकडे जाण्याची आज्ञा केली.
त्यानुसार प.प. स्वामी महाराजांनी हिमालय सोडले आणि ते दक्षिणेकडे निघाले. भगवती मातेने घडवलेल्या अनेक नाट्यमय घटनांनंतर प.प. स्वामी महाराजांची भेट प.पू श्री वामनराव गुळवणी महाराज यांच्या बरोबर मध्य प्रदेशात होशंगाबाद येथे झाली. त्यापूर्वी प.पू श्री वामनराव गुळवणी महाराजांनी हठयोगाच्या मार्गाने कुंडलिनी शक्तीच्या जागरणाचे अनेक आटोकाट प्रयत्न केले होते पण त्यात यश काही मिळाले नव्हते. पण प.प. स्वामी महाराजांनी त्यांना शक्तिपात दीक्षा देवून क्षणार्धात शक्ती जागरणाचा परमोच्च अनुभव दिला.
प.प. स्वामीमहाराजांनी ३०-१ १९२७ (पौष वद्य दशमी) रोजी दंडी सन्यास ग्रहण केला. त्यानंतर त्यांचे नाव ‘स्वामी श्रीलोकनाथतीर्थ’ असे झाले. परमहंस परिव्राजक श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांचे संपूर्ण जीवन कालीमातेने संचालित केलेले होते. तिच्या आज्ञेशिवाय ते कोणतीही गोष्ट करत नसत. प.प. श्रीस्वामीमहाराज चमत्कार करण्याच्या विरोधात होते तथापि कालीमातेच्या कृपेने त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या त्यांचा उपयोग करून अनेक भक्तांच्या विविध समस्या त्यांनी दूर केल्या.
त्यांनी परिव्राजक अवस्थेत संपूर्ण भारतभर भ्रमण केले. महाराष्ट्राविषयी त्यांना विशेष ममत्व होते. महाराष्ट्रात बार्शी, पुणे येथे त्यांनी अनेक भक्तांकडे वास्तव्य केले होते. प.पू. श्री गुळवणी महाराजांवर त्यांनी पुत्रवत प्रेम केले.

१९५५ साली काशी मुक्कामी त्यांची प्रकृती खालावली त्यांनी त्यांच्या प्रमुख शिष्यांना काशीला बोलावले. देह त्यागानंतर स्वतःचे पार्थिव दगडाच्या पेटीत ठेवून गंगेत प्रवाहित करण्याची आणि त्यानंतर कालीमातेची पूजा करून ५४ कुमारीकांचे पूजन करण्याचे सर्वाना सांगितले. त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्वाना दिव्य अनुभव येईल असे आश्वासन दिले.
९ फेब्रुवारी १९५५ या दिवशी प.प. स्वामी महाराजांनी महाक्षेत्र काशी येथे देह त्याग केला. त्यांच्या सूचनेनुसार ५४ कुमारीकांचे पूजन झाल्यावर मंदिरातील कालीमातेच्या मूर्तीतून एक ज्योत निघाली आणि प्रत्येक कुमारिकेच्या डोळ्यांसमोरून ती तरंगत सर्वाना दर्शन देवून परत कालीमातेच्या मूर्तीत अंतर्धान पावली.प.प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराजांनी प्रवाहित केलेली महायोगाची गंगा परंपरेतील महापुरुषांनी अखंड प्रवाहित ठेवली आहे. प.पू. श्रीगुळवणी महाराज यांच्या द्वारे ती महाराष्ट्रात अवतीर्ण झाली. ‘श्रीवासुदेव निवास’ हे महायोग परंपरेतील मूळपीठ आहे.
प. पू. गुळवणी महाराज आणि लोकनाथतीर्थ स्वामींचा संबंध
प. पू. वामनराव गुळवणी महाराज आणि श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज यांचे नाते ‘गुरु-शिष्य’ परंपरेतील एक सुवर्णपान आहे.
वामनराव गुळवणी महाराज नर्मदा परिक्रमेत असताना त्यांची भेट होशंगाबाद येथे स्वामींशी (तेव्हाचे स्वामी चिन्मयानंद सरस्वती) झाली. स्वामींचे वय कमी असूनही त्यांचा अधिकार मोठा होता. एकदा स्वामींची प्रकृती बिघडलेली असताना गुळवणी महाराजांनी त्यांना आपल्या घरी आणून त्यांची सेवा केली. यावेळी स्वामींनी गुळवणी महाराजांचा प्राणायामाचा सराव जवळून पाहिला.गुळवणी महाराजांना त्यांच्या मूळ गुरूंनी (प. पू. श्री थोरले महाराज) स्वप्नात दृष्टांत देऊन स्वामींकडून दीक्षा घेण्याची आज्ञा केली. त्यानुसार स्वामींनी गुळवणी

महाराजांना मस्तकावर स्पर्श करून ‘वेधदीक्षा’ दिली. दीक्षा मिळताच गुळवणी महाराजांना कुंडलिनी जागृतीचे तीव्र अनुभव (दार्दुरी गती इ.) आले. लोकनाथतीर्थ स्वामींच्या आज्ञेनुसारच गुळवणी महाराजांनी महाराष्ट्रात ‘शक्तिपात योगा’चे कार्य वाढवले. पुण्यात स्वामींचा दीर्घकाळ मुक्काम गुळवणी महाराजांच्या घरीच असे.स्वामींच्या महासमाधीनंतर गुळवणी महाराजांनी या परंपरेचे समर्थपणे नेतृत्व केले आणि हजारो साधकांना या योगाची दीक्षा देऊन त्यांचे जीवन कृतार्थ केले.आज महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये त्यांचा खूप मोठा शिष्य संप्रदाय आहे.






