Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

आजपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली असून देशभरात विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. पगार रचना, आयकर नियम, पॅन-आधार प्रक्रिया, परदेश प्रवास, तसेच रेल्वे तिकीट नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांपासून नोकरदार वर्गावर होणार आहे.

सर्वात मोठा बदल म्हणजे पगार संरचनेत. नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिपमध्ये बेसिक पे (मूळ वेतन) हे एकूण वेतनाच्या किमान 50% असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे ईपीएफ आणि ग्रॅच्युइटीमध्ये वाढ होणार असून दीर्घकालीन बचतीस मदत होईल. तसेच नोकरी संपल्यानंतर ग्रॅच्युइटी वगळता उर्वरित सर्व देयके 2 दिवसांत मिळणार आहेत.

आयकर व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आले आहेत. 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना करमाफी देण्यात आली आहे. आयकर रिटर्न (ITR) सुधारण्यासाठी आता 12 महिन्यांची मुदत देण्यात आली असून 9 महिन्यांनंतर शुल्क लागू होईल. याशिवाय, फॉर्म 16 ऐवजी नवीन फॉर्म 130 आणि 131 लागू होणार आहेत.

पॅन कार्ड मिळवण्यासाठी आता फक्त आधार कार्ड पुरेसे राहणार नाही. नागरिकांना जन्म दाखला, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा इतर ओळखपत्रे सादर करावी लागणार आहेत. परदेश प्रवास, शिक्षण किंवा वैद्यकीय खर्चासाठी टीसीएस दर 2% करण्यात आला आहे, जो यापूर्वी 5% ते 20% दरम्यान होता.

रेल्वे प्रवाशांसाठीही नियम बदलले आहेत. गाडी सुटण्याच्या 8 तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही. 8 ते 24 तासांपूर्वी रद्द केल्यास 50% परतावा, 24 ते 72 तासांपूर्वी 25% कपात, तर 72 तासांपूर्वी रद्द केल्यास फक्त सेवा शुल्क आकारले जाणार आहे.

बँका त्यांच्या काही दैनंदिन नियमांमध्ये सुधारणा करत आहेत. या बदलांचा परिणाम तुम्हाला तुमच्या पैशांचा वापर कसा करता येईल, यावर होऊ शकतो.

एचडीएफसी बँक, रोख पैसे काढण्यासीठी यूपीआय आधारित एटीएमसुविधेचा पाच वेळा मोफत वापर केल्यानंतर, त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी २३ रुपये शुल्क आकारण्यास सुरुवात करणार आहे.

दरम्यान, पंजाब नॅशनल बँक (PNB) काही विशिष्ट डेबिट कार्ड्ससाठी पैसे काढण्याची मर्यादा कमी करत आहे. अनेक प्रकरणांमध्ये, ही मर्यादा आता ५०,००० ते ७५,००० रुपयांच्या दरम्यान असेल, जी पूर्वीच्या तुलनेत कमी करण्यात आली आहे.

याशिवाय, मुंबईत वीज दरात कपात करण्यात आली असून नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. रेडी रेकनर दर मात्र स्थिर ठेवण्यात आले आहेत. तसेच इंडिगो, एअर इंडिया आणि इतर विमान कंपन्यांच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

एकूणच, नव्या आर्थिक वर्षात लागू झालेल्या या बदलांचा परिणाम आर्थिक नियोजन, बचत आणि खर्चावर मोठ्या प्रमाणात होणार आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here