प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक व्यापार आणि कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम होत असून त्यातच आता अंड्यांच्या व्यापारावर नवे नियम लागू झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्यानंतर इराणने महत्त्वाचे पोर्ट बंद केले असून होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा तेल आणि गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा थेट परिणाम जागतिक व्यापारावर झाला असून भारतातून आखाती देशांकडे होणारी निर्यात ठप्प झाली आहे. बंदरांवर केळी, कांदा, द्राक्षे आणि सुकामेवा यांचे सुमारे १००० ते १७५० कंटेनर अडकून पडले आहेत. त्यामुळे निर्यातदारांसह शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
या परिस्थितीत देशातील कृषी क्षेत्र आधीच अडचणीत असताना अंड्यांच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. यामुळे पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने अंड्यांच्या गुणवत्तेबाबत कडक नियम लागू करत १ एप्रिलपासून प्रत्येक अंड्यावर ‘एक्स्पायरी डेट’ छापणे बंधनकारक केले आहे. या निर्णयामुळे साठवणूक, पॅकेजिंग आणि वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता आहे. परिणामी व्यापाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक ताण येणार असून त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांवर होणार आहे.
एकीकडे जागतिक संघर्षामुळे निर्यात ठप्प झाली आहे, तर दुसरीकडे स्थानिक नियमांमुळे अंड्यांच्या किमती घसरल्या आहेत. या दुहेरी संकटामुळे देशातील शेतकरी आणि व्यापारी हवालदिल झाले असून शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.






