Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

मागील लेखा मध्ये आपण जन्मपत्रिका,लग्नपत्रिका,कुंडली यांच्यातील फरक सोप्याभाषेत आणि समर्पक उदाहरणासहीत पहिला आहे. (ज्यांनी मागचा लेख वाचला नाही त्यांनी https://prasarmadhyam.news/astrology-predictions/ या लिंक वर जाऊन वाचवा भावचलित कुंडली  समजायला सोप होईल )

या लेखात आपण भावचलित कुंडली  वास्तविक जीवनाशी कशी समर्पक आहे हे जाणून घेऊ.

 

प्राचीन संकल्पना केवळ ग्रंथांपुरत्या मर्यादित नाहीयेत त्या आपल्या रोजच्या जीवनाचा आपल्या कर्माचा भाग आहेत जेव्हा आपण एखाद्याच्या आयुष्याकडे बघतो तेव्हा वरवर दिसणाऱ्या गोष्टी आणि आत चाललेल्या कर्माचे चक्र यात खूप फरक असतो. भावचालीत कुंडली हे याच कर्माच विज्ञान समजून घेण्याचे एक प्रगत साधन आहे. राशी कुंडली आपल्याला फक्त एखाद्या व्यक्तीच पोटेन्शियल किंवा संभाव्यता (Probability) सांगते पण भावचलित कुंडलीच गणितीय स्वरूप ते थोडं वेगळं आणि अधिक सूक्ष्म असतं.
आपण अनेकदा पाहतो एखाद्याच्या राशी कुंडलीत प्रचंड यश, राजयोग, सुखसंपत्ती, कीर्ती असे भक्कम संकेत दिसतात; पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र तीच व्यक्ती सतत संघर्ष करताना दिसते. मग प्रश्न पडतो ज्योतिषशास्त्र चुकते का? की आपण काहीतरी अपूर्ण पाहतो? याच प्रश्नाचे उत्तर शोधणे हा या लेखाचा उद्देश आहे. प्राचीन वैदिक ज्ञान आणि आधुनिक जीवनशैली यांची सांगड घालत आज आपण भावचलित कुंडली या संकल्पनेचा सखोल विचार करूया

आधी समजून घेऊया राशी कुंडली  (म्हणजेच डी-१ चार्ट किंवा जन्मकुंडली)  त्या राशी कुंडलीत प्रत्येक रास ३० अंशांची असते १२ राशी म्हणजे १२ समान भाग एका राशीतून दुसरी रास सुरू झाली की नवीन भाव सुरू होतो. हे गणित सुटसुटीत आणि सरळ आहे. राशी कुंडली ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची ब्लूप्रिंट असते.आपली क्षमता, प्रवृत्ती, स्वभाव, संभाव्यता यांचे चित्रण ती करते.

उदाहरण बघायचे झाले तर नवव्या भावातील गुरु म्हणजे भाग्यवान व्यक्ती, सातव्या भावातील शुभ ग्रह म्हणजे त्या जातकाचे उत्तम वैवाहिक जीवन,दहाव्या भावातील बलवान ग्रह म्हणजे त्या जातकाचे यशस्वी करिअर पण इथेच एक सूक्ष्म स्तर आहे जो आपण अनेकदा दुर्लक्षित करतो.

भावचलित कुंडली म्हणजे सूक्ष्म गणित, सूक्ष्म अर्थ

भावचलित कुंडली ही जन्मवेळेच्या अचूक लग्नाच्या अंशावर आधारित असते. यामध्ये भाव नेहमीच ३० अंशांचे समान नसतात. पृथ्वीचा अक्षांश, रेखांश आणि जन्मस्थान यांचा विचार करून भावांची विभागणी केली जाते.

यासाठी पारंपरिक ज्योतिषात श्रीपती पद्धत वापरली जाते. श्रीपती सिस्टीम म्हणजे एक अशी गणिती पद्धत जी आपली पृथ्वी गोल आहे आणि अक्षांश रेखांश म्हणजेच लॅटीट्युड लॉन्जीिट्युड यांचा वेळेवर काय परिणाम होतो हे लक्षात घेऊन भावांची अचूक विभागणी करते. म्हणजे भौगोलिक स्थिती लक्षात घेते.साध्या भाषेत सांगायचं तर राशी कुंडलीत आपण आकाशाचे बरोबर 30 अंशाचे 12 समान भाग करतो जसं एखाद्या पिझ्झाचे 12 समान तुकडे करावेत पण प्रत्यक्ष अवकाशात आपण पृथ्वीवर ज्या ठिकाणी जन्म घेतो तिथून आकाशाकडे पाहताना हे तुकडे नेहमीच समान नसतात काही भाव 30 अंशापेक्षा मोठे असू शकतात तर काही खूप लहान या वास्तवावर आधारित जे क्लिष्ट गणित मांडलं जात त्याला श्रीपती पद्धत म्हणतात

सर्वात महत्त्वाचा नियम:

भावचलित कुंडलीत ग्रह आपली रास कधीच बदलत नाहीत ते फक्त आपला भाव बदलतात म्हणजे ग्रहाचा मूळ स्वभाव तोच राहतो पण तो व्यक्ती ज्या क्षेत्रात काम करणार आहे ते क्षेत्र बदलतं,आणि हाच तो तांत्रिक फरक आहे जो संपूर्ण  फलिताचा अर्थ बदलून टाकतो. म्हणजे राशी कुंडली जर एखादी रेसिपी असेल अगदी तंतोतंत मापाची तर भावचलित कुंडली म्हणजे तो बनलेला पदार्थ पण प्रत्यक्ष त्या पदार्थाची चव रेसिपी मध्ये सांगितल्या प्रमाणे अगदी तशीच असेल असे नाही वेगळी हि असू शकते. कारण पदार्थ बनताना इतर गोष्टींच्या परिणामामुळे जसे की तोच पदार्थ त्याच रेसिपीने चुलीवर आणि गॅस बनवलेला चवीतला फरक अस्सल खवय्या लगेच हेरतो,अगदी तसेच भावचलित कुंडली त्या परिणाम कारक सूक्ष्म घटकांचा उलघडा करते. म्हणजेच जीवनाची चव का बदलली रेसिपी तर तीच होती याचेच उत्तर भावचलित कुंडली देते.

समजा एखाद्या व्यक्तीच लग्न वृश्चिक राशीत 18 अंशावर आहे 18 अंश आता राशी कुंडलीत पहिला भाव शून्य अंशापासून सुरू झालेला दिसेल पण भावचलित कुंडलीत पहिला भाव शून्य अंशापासून नाही तर थेट 18 अंशापासून सुरू होतो. पूर्ण चक्रच थोड पुढे सरकत,आणि यामुळे काय होतं समजा मंगळ हा ग्रह वृश्चिक राशीत दोन अंशावर आहे राशी कुंडलीत तो पहिल्याच भावात दिसेल पण भावचलितच गणित लावल्यावर तोच मंगळ बाराव्या भावात गेलेला असू शकतो. रास तीच वृश्चिकच राहिली पण भाव बदलला आणि यामुळे त्या ग्रहाच मिळणार फळ आणि त्याचा आयुष्यावरील परिणाम पूर्णपणे बदलून जातो भावचलित मुळे एखाद्याच नशीब खरोखरच बदलत का यावर एक अतिशय स्पष्ट दृष्टिकोन असा आहे की भावचलित कुंडली नशीब बदलत नाही तर ती नशीब कुठे फळाला येईल हे अचूकपणे सांगते जसा आपण कॅमेराचा फोकस ऍडजस्ट करतो ना तेव्हा अस्पष्ट दिसणारे चित्र अचानक स्पष्ट दिसायला लागतं अगदी तसंच हे काम करतं

उदाहरण: सूक्ष्म बदल, मोठा परिणाम समजा,लग्न वृश्चिक राशीत १८ अंशावर आहे.मंगळ वृश्चिक राशीत २ अंशावर आहे.राशी कुंडलीत तो पहिल्या भावात दिसेल.पण भावचलित गणितानुसार तो बाराव्या भावात जाऊ शकतो.रास तीच वृश्चिक पण जीवनातील क्षेत्र बदलले(खर्चिक स्वभाव, परदेशगमन) एकांत या दिशेकडे हा फरक संपूर्ण फलित बदलून टाकतो.

१) प्रत्यक्ष भाव जागृती (Real House Activation)

समजा गुरु हा राशी कुंडलीत नवव्या भावात आहे म्हणजे भाग्य, गुरुकृपा, धर्म स्थिती चांगली आहे.
व्यक्तीला वाटेल “माझं नशीब जोरात आहे.पण भावचलितमध्ये तोच गुरु आठव्या भावात असेल तर अचानक संकट आर्थिक उलथापालथ परिवर्तनातून यश मिळते म्हणजे यश नाकारले जात नाही पण त्याचा मार्ग संघर्षातून जातो.

२) नातेसंबंध आणि ऋणानुबंध

अनेकदा राशी कुंडलीत सातवा भाव खूप बलवान आणि चांगला दिसत असेल तर असं मानलं जातं की वैवाहिक जीवन अत्यंत सुरळीत असेल पण भावचलित मध्ये जर तोच ग्रह सहाव्या किंवा आठव्या भावात जात असेल तर त्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो,म्हणजे सहावा भाव हा रोग कर्ज आणि शत्रूचा आहे. आणि आठवा भाव बदलाचा आणि संघर्षाचा आहे अशा वेळी सुखी वैवाहिक जीवन असा पारंपरिक अर्थ न राहता नात्यातून होणारी कर्माची शुद्धी असा त्याचा अर्थ होतो. इथेच दोन व्यक्तींमधील ऋणानुबंध कसे काम करतात. हे खऱ्या अर्थाने समजतं.

ऋणानुबंध म्हणजे दोन आत्म्यांमधील जुना हिशेब म्हणजे एखादं नातं फक्त आनंदासाठी किंवा रोमॅंटिक आयुष्यासाठी नसून मागच्या जन्माचे काही कर्म पूर्ण करण्यासाठी काही धडे शिकण्यासाठी जुळून आलेलं असतं.म्हणजे थोडक्यात देणं घेणं असतं. हो समजा एखाद्या जोडप्याच्या आयुष्यात सतत वाद होत आहेत.किंवा लग्नानंतर लगेचच एका जोडीदाराला गंभीर आजार झाला आणि दुसऱ्याला त्याची सतत सेवा करावी लागली राशी कुंडली बघून लोक म्हणतील अरे यांचे तर एवढेच चांगले योग होते मग असं का झालं पण भावचलित पाहिल्यावर समजतं की हे नाते एकमेकांना नुसतं सुख देण्यासाठी नाही तर त्या सेवेतून त्या त्यागातून आत्म्याची शुद्धी करण्यासाठी निर्माण झालय.

म्हणजे उशिरा होणारे विवाह किंवा नात्यात अचानक येणारा दुरावा हे सगळं समजून घेण्यासाठी हा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा ठरतो. हे ऐकल्यावर नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो आणि मला वाटतं हे नातेसंबंधांच्या बाबतीत जितकं खरं आहे.तितकंच ते करिअरच्या बाबतीतही असावं.

 

 

३) करिअर आणि अंतर्मन

आजच्या काळात प्रत्येकाला हा प्रश्न असतो की बिझनेस करावा की जॉब मध्ये जावं की स्वतःचं काहीतरी करावं आणि करियरच्या बाबतीतला हा गोंधळ भावचलित बऱ्याच अंशी सोडवते बघा राशी कुंडलीत एखादी व्यक्ती कॉर्पोरेट क्षेत्रात खूप यशस्वी होताना दिसेल त्यांचा दहावा भाव खूप मजबूत वाटेल पण जेव्हा आपण भावचलित पाहतो तेव्हा कदाचित ती ऊर्जा नवव्या किंवा बाराव्या भावात गेलेली असते.नववा भाव म्हणजे धर्म आणि तत्वज्ञानाचा हो नववा भाव हा धर्म,तत्वज्ञान आणि अध्यापनाचा आहे. आणि बारावा भाव हा संन्यास एकांत आणि परदेशाचा आहे.म्हणजे एखादी व्यक्ती कॉर्पोरेट जगात दिवसभर लॅपटॉपवर प्रेझेंटेशन बनवत असते. केबिनमध्ये बसून मीटिंग घेत असते. पण आतून तिला हिमालयात जाऊन बसण्याची किंवा एखाद छोटसं कॅफे चालवण्याची इच्छा असते. असा तो प्रकार आहे. बाह्य जगात ती व्यक्ती अत्यंत यशस्वी सीईओ वाटेल पण आतून ती पूर्णपणे अस्वस्थ असू शकते. मग हळूहळू व्यक्ती अध्यापन स्पिरिचुअल लिडरशिप किंवा समाज काार्याकडे खेचली जाते.म्हणजे त्यांचा खरा कल तिकडे असतो. त्यांना कॉर्पोरेट बोर्डरूम पेक्षा हिमालयात किंवा ऋषिकेश,हरिद्वार मधल्या आश्रमात जाऊन ध्यान जप तप आणि सेवेत रमावे,एखादा अनाथ आश्रम चालवून सेवा करावी  किंवा लोकांना ज्ञान वाटण्यात जास्त शांती,आनंद आणि समाधान मिळते.

त्यांचा दहावा भाव खऱ्या अर्थाने भौतिक यशापेक्षा धर्म आणि ज्ञानाच्या मार्गावर कार्यरत होतो. आणि ज्ञान ही अशी गोष्ट आहे जी वाटल्याने वाढते, अशा व्यक्तींच खरं कर्मक्षेत्र हेच असतं.

४)परदेश आणि एकांत
आजकाल बऱ्याच जणांना परदेशात जायचं असतं आणि बाराव्या भावाचा संबंध याच परदेश गमनाशी लावला जातो.बारावा भाव हा अतिशय गुढ आणि सूक्ष्म भाव आहे राशी कुंडलीत बाराव्या भावात ग्रह दिसला की लगेच असं वाटू शकत की परदेशात जाण्याची संधी मिळेल.पण भावचलित कुंडलीत हे स्पष्ट करतं की बाराव्या भावातील ऊर्जा केवळ खर्च वाढवेल की अध्यात्मिक एकांत देईल.समजा परदेशवारी घडली तरी तो एकांत स्वतः निवडलेला असेल की परिस्थितीमुळे लादलेला असेल.म्हणजे परदेशात जाऊन भरपूर पैसे कमवण हा एक भाग झाला पण तिथे गेल्यावर येणारा एकटेपणा हा दुसरा भाग आहे.एखादी व्यक्ती अमेरिकेत किंवा युरोपमध्ये जाऊन डॉलर मध्ये किंवा पाऊंड मध्ये प्रचंड पैसा कमवेल बाह्य जगासाठी ती सक्सेसफुल असेल पण भावचलित मध्ये जर तिथे पाप ग्रह असतील तर तिला सतत एकाकीपणा मानसिक ताण आणि माय देशाची ओड सहन करावी लागेल हा एकांत लादलेला असतो. या उलट आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्यांसाठी हाच भाव मोक्षाची दिशा ठरवतो ते स्वतःहून जगापासून दूर जाऊन एकांतात साधनेचा मार्ग निवडतात. म्हणजे जेव्हा फक्त राशी कुंडली वाचली जाते तेव्हा फक्त संभाव्यता किंवा प्रॉमिस पाहिलं जातं पण घटना प्रत्यक्षात कधी आणि कशी घडेल हे भावचलित अचूक दाखवतं.

         प्रत्येकानेच भावचलित कुंडली पाहायलाच हवी असे नाही ज्यांना फक्त वरवरची माहिती हवी आहे असे लोक व ज्यांचे अगदी साधे आणि रोजच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहेत. त्यांच्यासाठी राशी कुंडली पुरेशी असते त्यांना इतक्या खोलात जाण्याची गरज नसते. भावचलित कुंडली कुणी पहावी तर जे गंभीर साधक आहेत ज्यांना कर्माचे विज्ञान खऱ्या अर्थाने समजून घ्यायचा आहे.ज्यांच्या मनात ज्ञान प्राप्तीची ओढ आहे,दुसर म्हणजे ज्यांच्या आयुष्यातील घडणाऱ्या घटना आणि त्यांच्या कुंडलीचे केले गेलेल भाकीत यात खूप मोठी तफावत आहे. अशा लोकांसाठी म्हणजे कुंडलीत सर्व राजयोग आहेत पण खिशात मात्र छदाम नाही अशी ज्यांची अवस्था आहे त्यांनी भावचलित नक्की पहावी तसेच करियर आणि लग्नाचे असे काही निर्णय जे पूर्ण आयुष्य मुळापासून बदलून टाकणारे आहेत. त्यावेळी याचा सखोल अभ्यास करणं जास्त योग्य राहतं आणि विशेषतः जे आध्यात्मिक साधक आहेत. जे मोक्ष योग संन्यास योग किंवा सिद्ध अवस्था शोधत आहेत त्यांच्यासाठी तर हा एक मोठा आरसाच आहे.

राशी कुंडली आपल्याला सांगते की एका व्यक्तीमध्ये योद्ध्याची ऊर्जा आहे. त्याच्या मध्ये एक वॉरियर एनर्जी आहे. पण भावचलित आपल्याला हे सांगतं की हे युद्ध कुठल्यातरी बाह्य रणभूमीवर किंवा कॉर्पोरेट जगात नाही तर स्वतःच्या कुटुंबात किंवा नात्यांमध्ये लढलं जाईल हे एक कार्मिक बॅटल फिल्ड आहे. याच ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची आध्यात्मिक पातळी उघडते ज्याला आपण तप म्हणतो आत्म्याची ओढ कदाचित संन्यासाकडे एकांताकडे असू शकते. हे राशी कुंडलीत दिसेल पण भावचलित त्या व्यक्तीला सतत कौटुंबिक किंवा सामाजिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकवून ठेवेल म्हणजे मनात सतत विचार येईल की मी हे सगळं का करतोय? मला यातून मुक्त व्हायच आहे.आणि या दोन गोष्टींमधला जो ताण आहे ही जी ओढताण आहे तेच खऱ्या अर्थाने तप आहे. यासाठी आपण एक समर्पक उदाहरण पाहू, कर्माला आपण एका बागेसारखं समजू शकतो. जस आपण बागेत एखाद बी पेरतो ती बी म्हणजे राशी कुंडली आहे त्या बीजामध्ये एक मोठा वृक्ष होण्याची क्षमता नक्कीच आहे. पण ती बी कुठल्या मातीत पेरली गेली आहे ? तिला किती छान ऊन मिळतय? किती चांगल पाणी मिळतय? आणि तिथे आजूबाजूला किती तण उगवला आहे? हे सर्व भावचलीत ठरवतं तेच तप आहे, आणि हेच तप प्रारब्ध घडवतं.

राशी कुंडली आपल्याला सांगते मी कोण आहे पण भावचलित कुंडली सांगते आयुष्य माझी परीक्षा कुठे घेणार आहे हे सूत्र प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखं आहे.

जर भावचलित कुंडली हे आपल्या कर्माचे रणांगण ठरवत असेल तर आपली स्वतंत्र इच्छाशक्ती किंवा ज्याला आपण फ्री विल म्हणतो ती त्यावेळेस नेमकी कुठे असते?

आपण युद्ध कुठे लढतो यात ती आहे की परिस्थितीने दिलेल्या रणांगणावर आपण युद्ध कसे लढतो यात आहे यावर नक्की विचार करावा कारण परिस्थिती कदाचित आपल्या हातात नसेल पण त्या परिस्थितीला दिला जाणारा प्रतिसाद नेहमीच आपल्या हातात असतो.

आपल्या जीवनात राशी कुंडली विरुद्ध प्रत्यक्ष अनुभव (वास्तविक जीवन) असा संघर्ष नसून या रणांगणावर लढताना आपण कोणता दृष्टिकोन स्वीकारतो हे महत्त्वाच आहे.

 

 

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here