प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातामुळे गेल्या 20 तासांपासून महामार्गावर तब्बल 30 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
या गंभीर परिस्थितीचा फटका प्रवाशांना बसला असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व एसटी बससेवा तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक एसटी बसेस आधीच वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
सध्या मुंबईकडे जाणारी एकच लेन आणि पुण्याकडे जाणाऱ्या दोन लेन अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. याशिवाय जुन्या पुणे–मुंबई महामार्गावरही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला असून, प्रवासादरम्यान पाणी व आवश्यक अन्नसामग्री सोबत ठेवण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त टँकरमधून अद्यापही गॅस लिकेज सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्याचे काम सुरू असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच टँकर बाजूला करण्यात येणार आहे. त्यानंतरच पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी नेमका किती वेळ लागेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
तोपर्यंत वाहनचालकांनी पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास टाळावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी पुन्हा एकदा केले आहे.





