The last date for submission of entries for the State Drama Competition organized by the Directorate of Cultural Affairs, Government of Maharashtra, has been extended.
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्याच्या अंतिम तारखेत वाढ करण्यात आली आहे. आता या प्रवेशिका सादर करण्यासाठी १० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या अगोदर प्रवेशिका सादर करण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट निश्चित करण्यात आली होता. मात्र गणेशोत्सव, पावसाळी परिस्थिती आणि इतर अडचणींमुळे अनेक नाट्यसंस्था व संघटनांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. जास्तीत जास्त संघांना या स्पर्धेत भाग घेता यावा, यासाठी प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य संचालनालयाला दिले होते.
या सूचनेच्या अनुषंगाने प्रवेशिका सादर करण्यास दिनांक १० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे.
दरम्यान, राज्य नाट्य स्पर्धेच्या विविध वर्गवारीत भाग घेण्यास इच्छुक संघांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संबंधित संघांनी https://mahanatyaspardha.com या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा, असेही संचालनालयाच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे राज्यभरातील नाट्यसंस्था, संघटना व कलावंतांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होणार आहे.