प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
पर्नोड रिकार्ड या फ्रेंच मद्यनिर्माता कंपनीविरोधात भारताच्या स्पर्धा आयोगाने The Competition Commission of India (CCI) चौकशीचे आदेश दिले आहेत. कंपनीने आपल्या ब्रँडच्या विक्रीला चालना देण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांशी विशेष करार करून प्रतिस्पर्धी कंपन्यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
एका परदेशी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, २०२४ पासून भारतीय स्पर्धा आयोग (CCI) या प्रकरणाची प्राथमिक तपासणी करत होता. दिल्लीतील काही विक्रेत्यांसोबत संगनमत करून कंपनीने आपल्या उत्पादनांना प्राधान्य दिल्याची तक्रार करण्यात आली होती.
पर्नोड रिकार्डच्या पोर्टफोलिओमध्ये Chivas Regal आणि Absolut यांसारखे लोकप्रिय मद्यब्रँड आहेत. भारत हा कंपनीसाठी वेगाने वाढणारा आणि महत्त्वाचा बाजार मानला जातो.
CCI च्या आदेशानंतर आता या कथित स्पर्धाविरोधी व्यवहारांची सखोल चौकशी केली जाणार आहे. या चौकशीमुळे भारतीय मद्यबाजारातील व्यावसायिक पद्धतींवरही लक्ष केंद्रित होण्याची शक्यता आहे.






