प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
इराणच्या संसद अध्यक्ष मोहम्मद बाकेर कालिबाफ यांनी अमेरिकेसोबत होणाऱ्या चर्चेबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. लेबनॉनमध्ये तात्काळ युद्धविराम आणि इराणचा गोठवलेला निधी मुक्त केल्याशिवाय तेहरान कोणत्याही चर्चेत सहभागी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
क़ालिबाफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले की, दोन्ही बाजूंमध्ये आधीच दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती झाली होती. मात्र, त्या उपाययोजना अद्याप अंमलात आणल्या गेलेल्या नाहीत.
त्यांनी ठामपणे सांगितले की, “लेबनॉनमधील युद्धविराम आणि इराणचा अडवलेला निधी मुक्त करणे” या दोन अटी पूर्ण झाल्यानंतरच चर्चा सुरू होऊ शकते.
दरम्यान,इराण आणि युनायटेड स्टेट्स यांच्यात शनिवारी इस्लामाबाद येथे नव्या फेरीतील चर्चा होणार आहेत. ही चर्चा अमेरिकेने आणि तेलअविव प्रशासनाने इराणविरुद्ध सुरू केलेल्या संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
यापूर्वी, दोन्ही देशांनी पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन आठवड्यांच्या युद्धविरामाला मान्यता दिली होती. इराणने मांडलेल्या १० मुद्द्यांच्या प्रस्तावाला अमेरिकेने मान्यता दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
इराणच्या भूमिकेमुळे आगामी चर्चेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर याकडे लक्ष लागले आहे.
(बातमी सौजन्य फार्स वृत्तसंस्था इराण)






