प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम अद्याप कायम असल्याचा दावा केला असला, तरी होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकन युद्धनौकांवर झालेल्या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढला आहे. गुरुवारी इराणने तीन अमेरिकन विध्वंसक युद्धनौकांवर क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि छोट्या बोटींद्वारे हल्ला केल्याचा आरोप अमेरिकेच्या सेंटकॉमने केला. मात्र, कोणतीही जहाजे नुकसानग्रस्त झाली नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले.
या हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई केल्याचे सांगितले. दुसरीकडे, तेहराननेच अमेरिकेवर युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेने तेलवाहू जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणने प्रत्युत्तर दिल्याचे इराणी लष्कराने म्हटले.
वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “युद्धविराम कायम आहे. त्यांनी आमच्याशी किरकोळ चिथावणीखोर कृती केली आणि आम्ही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.”
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराणला पुन्हा इशारा देत म्हटले की, “करार लवकर झाला नाही, तर पुढील कारवाई अधिक कठोर आणि हिंसक असेल.”
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आशावादी भूमिका घेत युद्धविराम दीर्घकालीन शांततेत परिवर्तित होईल, असा विश्वास व्यक्त केला. इराणनेही पाकिस्तानमार्फत आपली भूमिका मांडण्याचे संकेत दिले आहेत.
लेबनॉनमध्येही तणाव वाढला
इराण-अमेरिका संघर्षाचा परिणाम लेबनॉनवरही दिसून येत आहे. इस्रायलने दक्षिण बेरूतमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा एक कमांडर ठार झाला. त्यानंतर लेबनॉनमध्ये तणाव वाढला असून, अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल-लेबनॉन चर्चा १४ आणि १५ मे रोजी होणार असल्याचे समोर आले आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीत अडकली हजारो जहाजे
फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवरील हालचाली मोठ्या प्रमाणावर रोखल्या आहेत. त्यामुळे सुमारे १,५०० जहाजे आणि २० हजारांहून अधिक खलाशी आखाती प्रदेशात अडकून पडल्याची माहिती आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने दिली आहे.






