सोलापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्रातील अनेक वस्तूंना भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळाल्यानंतर आता सोलापूरच्या ज्वारी आणि बाजरी पासून बनणाऱ्या कडक भाकरीलाही जागतिक ओळख मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दिशेने आवश्यक पावले उचलली जात असून लवकरच ही पारंपरिक भाकरी ” सोलापुरी ब्रँड ” म्हणून जगभरात भाव खाणार आहे.
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि स्थानिक बचत गटांच्या पुढाकाराने कडक भाकरीला GI मानांकन मिळवण्यासाठी फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन (FIEO) कडे अधिकृत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यानंतर FIEO ने सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू केली असून, भाकरीच्या वैशिष्ट्यांपासून ते तिच्या परंपरागत तयार करण्याच्या पद्धतीपर्यंत सविस्तर माहिती गोळा केली जात आहे.
सोलापुरी कडक भाकरीची वैशिष्ट्ये
सोलापूरची कडक भाकरी ही महाराष्ट्रातील दर्जेदार ज्वारी आणि बाजरीपासून बनवली जाते. शंभर टक्के शाकाहारी असलेली ही भाकरी खाण्यास अतिशय रुचकर असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक आहे. ती लवकर खराब होत नाही आणि दीर्घकाळ टिकते, त्यामुळे प्रवासात किंवा साठवणीसाठीही अत्यंत सोयीची ठरते.
पूर्वी सोलापूरची चादर आणि टेरी टॉवेल हे GI मानांकन मिळवणारे पहिले उत्पादने ठरले होते. आता कडक भाकरीलाही हे मानांकन मिळाल्यास स्थानिक शेतकरी, महिला बचत गट आणि उद्योजकांना मोठा आर्थिक फायदा होईल. जागतिक व्यापार कायद्यानुसार GI मानांकन प्राप्त उत्पादने जगभरात आपला ठसा उमटवितात आणि त्या शहराला तसेच उत्पादनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळते.
कडक भाकरीच्या जीआय मानांकनाच्या प्रक्रियेमुळे सोलापूरची नवी ओळख जागतिक पटलावर निर्माण होणार आहे, याची शहरवासीयांमध्ये उत्सुकता आहे.
————————————————————————————————






