कुरुंदवाड: प्रतिनिधी
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने शिरोळ तालुक्यातील कृष्णा-पंचगंगा नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. कृष्णेचा पूर ओसरल्याने नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर शुक्रवारी सायंकाळ पासून दर्शनासाठी खुले झाले आहे.
१७ जून पासून नृसिंहवाडी मंदिराला कृष्णेचा वेढा पडला होता. या दरम्यान २५ जुन व ४ जुलै रोजी असा दोनवेळा चढता दक्षिणद्वार सोहळा येथे पार पडला होता. तसेच गुरुवारी गुरुपौर्णिमादिवशी ही मंदिराभोवती पाण्याचा वेढा होता. यामुळे वरील बाजुस असलेल्या नारायणस्वामींच्या मंदिरातच गुरुपौर्णिमाचा उत्सव पार पडला. पावसाच्या उघडीपीमुळे पूर ओसरल्याने श्री दत्त मंदिर शुक्रवारी सांयकाळी दर्शनासाठी खुले झाले.
पुराच्या पाण्यामुळे मंदिराभोवती चिखल निर्माण झाला होता. देवस्थान समितीने कर्मचार्यांच्या मदतीने जसजसे पाणी ओसरेल तसतसे ते पाण्याच्या फवार्याने धुवुन स्वच्छ केले. यामुळे संपूर्ण मंदिर व परिसर अतिशय स्वच्छ ,सुदंर झाला आहे. मंदिरातील पाणी ओसरल्याने शुक्रवारपासुन श्री च्या सर्व पुजा, अर्चा ,विधी ,सेवा मुख्य मंदिरात सुरु राहतील. दत्त मंदिरातील नित्य होणारा श्रीं चा पालखी सोहळा गुरुपौर्णिमा पासून बंद झाला आहे. तो आता दसर्यापासून सुरु होईल.
गेल्या पंधरा दिवसापासुन दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेरुनच वाहत होते. शुक्रवारी सांयकाळी ५ वाजता शिरोळ तालुक्यातील राजापुर बंधार्याजवळ पाणी पातळी २७ फुट १० इंच होती. अजुनही कोयना धरणातुन २१०० व वारणा धरणातुन ४५०० क्युसेकने पाणी विसर्ग सुरुच आहे. शुक्रवारी सांयकाळी ५ वाजेपर्यंत कोयना धरणात ७२.८१ टीएमसी,वारणा धरणात २८.०७ टीएमसी पाणीसाठा आहे.अलमट्टी धरणात ८९.५३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
Be the first to write a review