कोल्हापूर : नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या कार्यकाळातील प्रशासकीय कामकाजाबाबत प्राप्त तक्रारींची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना मुंबईतील विधान भवनात निवेदन देण्यात आले.
प्राधिकरणाच्या बैठकींबाबत लोकप्रतिनिधींना आवश्यक माहिती अथवा निमंत्रण न देणे, आवश्यक माहिती उपलब्ध न होणे, संपर्क करूनही प्रतिसाद न मिळणे तसेच प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील ४२ गावांच्या लोकप्रतिनिधींशी अपेक्षित समन्वय न झाल्याच्या तक्रारी निवेदनातून मांडण्यात आल्या.
या प्रकरणातील प्रशासकीय नोंदी, बैठका, निर्णयप्रक्रिया आणि प्राप्त तक्रारींची तपासणी करून प्रथमदर्शनी अनियमितता आढळल्यास नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच प्राधिकरणाचे कामकाज अधिक प्रभावीपणे चालण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारीपदी दिलीप अण्णासाहेब कदम यांच्या नियुक्तीचा नियमानुसार विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे, उपाध्यक्ष शिवराम बुध्याळकर आणि सदस्य विकी कांबळे उपस्थित होते.






