आय-ट्रिपल-ई’च्या माध्यमातून संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा : डॉ. चाणक्य कुमार झा

0
10
Google search engine

कोल्हापूर : तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवान बदलांच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता संशोधन, नवोपक्रम आणि व्यावसायिक कौशल्यांच्या विकासावर भर द्यावा. ‘इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स’ (आय-ट्रिपल-ई)च्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आय-ट्रिपल-ई महाराष्ट्र विभागाचे सचिव डॉ. चाणक्य कुमार झा यांनी केले.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथील संगणकशास्त्र व डेटा सायन्स विभागातर्फे आय-ट्रिपल-ई विद्यार्थी शाखेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

आय-ट्रिपल-ईच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी संवाद, तांत्रिक उपक्रम, संशोधनाच्या संधी, प्रकल्प तसेच व्यावसायिक नेटवर्किंगचे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे डॉ. झा यांनी सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत विद्यार्थ्यांनी सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवावे, असेही त्यांनी नमूद केले.

अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा होते. विद्यार्थ्यांनी संशोधन व नवोपक्रमाची दृष्टी विकसित करून तंत्रज्ञान क्षेत्रातील समस्या सोडविण्याची क्षमता निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयाचे संचालक डॉ. अजित पाटील यांनीही विद्यार्थ्यांनी तांत्रिक उपक्रम, प्रकल्प आणि संशोधनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
यावेळी कॅपजेमिनीचे सिनिअर अँड्रॉइड डेव्हलपर किशोर गुरव यांनी उद्योगक्षेत्रातील बदलत्या अपेक्षा, करिअरच्या संधी आणि आवश्यक तांत्रिक कौशल्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थी शाखेच्या अध्यक्षपदी श्रेयश माने, तर समन्वयकपदी प्रा. एस. एम. रणभिसे यांची नियुक्ती करण्यात आली. संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. जी. व्ही. ओतारी आणि डेटा सायन्स विभागप्रमुख प्रा. तानाजी पाटील यांच्या सहकार्याने विविध तांत्रिक व विद्यार्थी-केंद्रित उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, विविध विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here