कोल्हापूर : वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘सौर अथवा विद्युतभारित तारेचे कुंपण’ योजनेच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा तातडीने समावेश करावा, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गगनबावडा, पन्हाळा, चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी आणि शाहूवाडी या तालुक्यांमध्ये गव्यांसह वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला असून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाच्या ४० टक्के अनुदानाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी इच्छुक असताना ऑनलाइन प्रणालीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा पर्याय उपलब्ध नसल्याने अर्ज करता येत नाही. त्यामुळे जिल्ह्याचा तातडीने प्रणालीमध्ये समावेश करून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.






