निकष बदला, अन्याय थांबवा’; शिक्षक मित्र कौस्तुभ गावडेंचा आक्रमक पवित्रा

0
37
Google search engine

कोल्हापूर : शिक्षकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह… अशा परिस्थितीत प्रस्तावित संचमान्यतेच्या निकषांविरोधात कोल्हापुरात शिक्षकांचा संताप रस्त्यावर उतरला. शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोकत शिक्षकांनी जोरदार निदर्शने केली आणि शासनाच्या प्रस्तावित संचमान्यता मसुद्याचा तीव्र निषेध केला.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. शिक्षकांचे रोजगार आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणणारे संचमान्यतेचे निकष तातडीने रद्द करून प्रचलित निकषांनुसार संचमान्यता करावी, अशी आक्रमक मागणी शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांनी केली.

प्रस्तावित मसुद्याची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील तब्बल ८ ते १० हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता असून, अनेक पूर्णवेळ शिक्षक अर्धवेळ होण्याचा धोका असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे शिक्षकांच्या सेवासुरक्षेसोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला.

प्रस्तावित संचमान्यता मसुद्यात ४५ मिनिटांची तासिका ४० मिनिटांची करण्याचा निकष सुचवण्यात आला आहे. यामुळे उपलब्ध तासिकांच्या गणनेत बदल होऊन मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विज्ञान शाखेतील एका बॅचची विद्यार्थीसंख्या २० वरून ३० करण्याचा प्रस्ताव असल्याने विज्ञान शाखेतील शिक्षकांच्या पदांवरही परिणाम होणार असल्याचे कौस्तुभ गावडे यांनी स्पष्ट केले.

तसेच वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखांसाठी १२० विद्यार्थीसंख्येचा निकष प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक तुकड्या अनुदानासाठी अपात्र ठरण्याची आणि कार्यरत शिक्षकांच्या सेवासुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणींकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले. उच्च माध्यमिक स्तरावरील ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे तांत्रिक अडचणी आणि प्रवेशास होणाऱ्या विलंबामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. परिणामी विद्यार्थीसंख्या घटून कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

या आंदोलनाला कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे सहसचिव दिलीप शितोळे, सातारा जिल्हा शिक्षक संघाचे सचिव गोविंद वाघ आणि बापू दाभाडे यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष आण्णासाहेब बागडी, सातारा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, सांगली जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरेश भिसे, अभिजीत दुर्गी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सातारा विभागप्रमुख शशिकांत काटे, सांगली सहविभागप्रमुख प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्रकाश हाके, प्रा. रवी जाधव आणि हितेंद्र साळुंखे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, अन्यायकारक संचमान्यता तातडीने रद्द करावी, वस्तुनिष्ठ निकषांवर फेरआढावा घ्यावा, कार्यरत शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि पारदर्शक ऑनलाइन संचमान्यता प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here