कोल्हापूर : जाणते-अजाणतेपणी हातून घडलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगत असताना कुटुंबीयांपासून दुरावलेल्या बंदीजनांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीच्या मायेची अनुभूती मिळावी, या उद्देशाने भागीरथी महिला संस्थेच्या वतीने कळंबा आणि बिंदू चौक कारागृहात रक्षाबंधन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला बंदीजनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संस्थेचे आभार मानले. बहिणीच्या मायेने बांधलेल्या राखीचा धागा पाहून अनेक बंदीजन भावूक झाले.
कोल्हापुरातील कळंबा आणि बिंदू चौक कारागृहात दोन हजारांहून अधिक बंदीजन शिक्षा भोगत आहेत. गुन्ह्याच्या शिक्षेमुळे कुटुंबीयांपासून दूर असलेल्या आणि सण-समारंभाचा आनंद घेता न येणाऱ्या या बंदीजनांसाठी कारागृह प्रशासनाच्या पुढाकारातून भागीरथी महिला संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
कारागृह अधीक्षक चंद्रकांत जठार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कारागृहामध्ये अशा सामाजिक आणि सकारात्मक उपक्रमांमुळे बंदीजनांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून गेल्या १६ वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
यानंतर भागीरथी महिला संस्थेच्या सदस्यांनी बंदीजनांचे औक्षण करून त्यांच्या हातावर राखी बांधली. बंदीजनांना भाऊ मानून त्यांच्याशी स्नेहाचे नाते जोडण्यात आले. राखीच्या पवित्र धाग्याने कारागृहाच्या भिंतीआड असलेल्या या व्यक्तींनाही रक्षाबंधनाच्या भावनेचा अनुभव मिळाला. या प्रसंगी अनेक बंदीजनांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
यावेळी संस्थेच्या सदस्यांनी बंदीजनांना भविष्यात गुन्हेगारीचा मार्ग सोडून कुटुंबासोबत आनंदाने आणि जबाबदारीने जीवन जगण्याचे आवाहन केले. आयुष्यात झालेल्या चुका मागे सोडून सकारात्मक विचारांनी नव्याने सुरुवात करण्याचा संदेशही देण्यात आला.
भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे बंदीजनांनी कौतुक केले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मिळालेल्या या स्नेहपूर्ण अनुभवाबद्दल त्यांनी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांचे आभार मानले.
या उपक्रमास धनंजय महाडिक युवाशक्तीचे सुनील वाडकर, नगरसेवक राजेंद्र गवळी, मयंक माने, बसवराज नाईक, शिवानी पाटील यांच्यासह भागीरथी महिला संस्थेचे सदस्य आणि कारागृह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.






