कोल्हापूर : दूध उत्पादकांना दिलासा देत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ने म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ ऑगस्ट २०२६ पासून म्हैस दुधाच्या दरात प्रतिलिटर १ रुपया ५० पैसे, तर गाय दुधाच्या दरात १ रुपया वाढ करण्यात आली आहे.
यानुसार ६.० फॅट व ९.० एसएनएफ म्हैस दुधाचा दर ५३.५० रुपयांवरून ५५ रुपये, तर ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गाय दुधाचा दर ३६ रुपयांवरून ३७ रुपये करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना महिन्याला सुमारे ५ कोटी रुपयांचा अतिरिक्त दर मिळणार आहे.
दरम्यान, गोकुळच्या म्हैस दुधाच्या विक्री दरातही प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली असून, ती १० ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. गाय दुधाच्या विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
गोकुळच्या प्रशासकीय मंडळाच्या ८ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत दुग्ध व्यवसायाला बळकटी देण्यासाठी ही दरवाढ करण्यात आल्याचे प्रशासकीय अध्यक्ष प्रदीप मालगावे यांनी सांगितले.






