प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
मुंबई: अमेरिकेतून आलेल्या सकारात्मक घडामोडींमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत आशादायक संकेत मिळताच गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि बाजाराने सकाळच्या सत्रातच भक्कम उसळी घेतली. आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर असलेली भीतीही यामुळे कमी झाल्याचे चित्र दिसून आले.
व्यापार सुरू होताच बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 निर्देशांकांनी सकारात्मक सुरुवात केली. सेन्सेक्सने 78,617.16 अंकांवर ओपनिंग घेतली, तर निफ्टी 50 ने 24,374.55 चा स्तर गाठला. सकाळी 9:20 वाजेपर्यंत सेन्सेक्स सुमारे 430 अंकांनी वधारून 78,950 वर पोहोचला होता, तर निफ्टी 117 अंकांनी वाढून 24,480 च्या आसपास ट्रेड करत होता.
या तेजीमध्ये अदानी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी आणि बजाज फायनान्स हे शेअर्स आघाडीवर होते. दुसरीकडे टेक महिंद्रा, टीसीएस आणि इन्फोसिस यांना सुरुवातीच्या सत्रात अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
सोमवारीही बाजारात सकारात्मक वातावरण होते. सेन्सेक्स 78,520 च्या वर बंद झाला होता, तर निफ्टी 24,364 च्या आसपास होता. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी कायम राहिल्याचे दिसून आले.
दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यात नव्या व्यापार कराराची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकन न्यायालयाने काही टॅरिफ बेकायदेशीर ठरवत त्यांना रद्द करण्याचे आदेश दिल्याने या चर्चेला गती मिळाली आहे. भारतीय अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून विविध आर्थिक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे.
गुंतवणूकदारांसाठी ही घडामोड सकारात्मक ठरत असून पुढील सत्रात बाजाराची दिशा कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





