Google search engine

प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक 

शहरातील शेंडापार्क परिसरात प्रस्तावित आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) अवघ्या एका दिवसात तब्बल ५ कोटी ६० लाख रुपये महसूल विभागाकडे जमा केले आहेत.

शहरातील ई वॉर्ड, मौजे कसबा करवीर येथील रि.स. नं. ५८३, ५८७ व ५८८ मधील सुमारे ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन आयटी क्षेत्राच्या विकासासाठी एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच मान्यता दिली होती. या जमिनीचे मूल्यांकन सन २०२५-२६ च्या बाजारभावानुसार ५,६०,२३,९८० रुपये इतके निश्चित करण्यात आले होते.
मात्र, ३१ मार्चनंतर नवीन आर्थिक वर्षात जमिनीच्या दरात सुमारे १५ टक्के वाढ होण्याची शक्यता होती. त्यामुळे वाढीव आर्थिक भार टाळण्यासाठी ही रक्कम मुदतीपूर्वी भरणे आवश्यक होते. हा विषय प्रलंबित राहू नये यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उद्योग मंत्री तसेच संबंधित सचिवांकडे सातत्याने पाठपुरावा केला.

त्यांच्या हस्तक्षेपानंतर मंत्रालय स्तरावरून तातडीने निर्देश देण्यात आले आणि शासकीय यंत्रणा गतिमान झाली. परिणामी, ३० मार्च रोजी सायंकाळी एमआयडीसीने संपूर्ण रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाकडे जमा केली.
या निर्णयामुळे कोल्हापूरातील आयटी पार्क प्रकल्पाला मोठा वेग मिळणार असून, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here