Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

महाशिवरात्री हा भगवान शिवाचा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या वर्षी म्हणजे 2026 मध्ये

महाशिवरात्री १५ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी उपवास, जप, पूजन आणि विशेषतः रुद्राभिषेक केल्यास महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, असे वेद-पुराणात सांगितले आहे.

मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करणे शक्य नसल्यास, घरीसुद्धा विधीपूर्वक रुद्राभिषेक करता येतो. जाणून घेऊया संपूर्ण शास्त्रोक्त पद्धत.

 रुद्राभिषेकाचे महत्त्व

हिंदू धर्मग्रंथांनुसार शिवलिंगावर अभिषेक करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. विशेषतः रुद्राभिषेक केल्याने 

मानसिक शांती मिळते

अडथळे दूर होतात

आरोग्य आणि आयुष्यवृद्धी होते

धन-समृद्धी प्राप्त होते

विवाह व संतानसुखाच्या इच्छा पूर्ण होतात

रुद्राभिषेक प्रामुख्याने सोमवार, श्रावण महिन्यातील दिवस, प्रदोष व्रत आणि महाशिवरात्रीला केला जातो.

 

 रुद्राभिषेकासाठी लागणारे साहित्य

शिवलिंग (धातूचे असल्यास उत्तम),रुद्राक्ष,चौरंग,पांढरे वस्त्र, पांढरी फुले,बेलपत्र,भस्म,पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर),सुपारी,हळद-कुंकू,अष्टगंध,अक्षता,धूप, दीप, अगरबत्ती,पंचपात्र व पळी,पाच फळे,गाईचे तूप,चुर्म्याचा प्रसाद / दूध / खीर

 रुद्राभिषेक पूजा मांडणी कशी करावी?

  • पूजाघर स्वच्छ करून घ्यावे.
  • चौरंगावर पांढरे वस्त्र अंथरावे.
  • शिवलिंग प्रथम जलाभिषेक करून स्वच्छ करावे.
  • शिवलिंग चौरंगावर स्थापित करावे.
  • प्रथम एका बाजूला सुपारी वर अक्षता आणि फुल वाहून सुपारीला  गणपतीच्या रूपात ठेवावी. नमन करून सुरवात करावी.
  • फळे दुसऱ्या बाजूला ठेवावीत.
  • धूप, दीप, अगरबत्ती लावून पूजा सज्ज करावी.
  • यानंतर शिवलिंग पंचपात्रात घेऊन रुद्राभिषेक सुरू करावा.

 रुद्राभिषेक विधी (संपूर्ण पद्धत)

  • शिवलिंगाला पंचपाळ्यात ठेवावे.
  • सर्वात आधी जलाभिषेक करावा. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा.
  • अभिषेक करताना “ओम नमः शिवाय” या मंत्राचा उच्चार करावा.
  • त्यानंतर पिंडीला अष्टगंध व भस्म लावावे व बेल,फुले अर्पण करावीत.
  • या नंतर रुद्राक्ष अर्पण करून “ओम नमो भगवते रुद्राय” या मंत्राचे १०८ वेळा पठण करावे.
  • त्यानंतर शिवोपासना मंत्रांचा जप करावा. मग भगवान शिवाच्या १०८ नामांचा जप करावा.
  • यजुर्वेदाच्या १६ व्या आणि १८ व्या अध्यायातील श्री रुद्रमचे पठण करावे.
  • श्री रुद्रमचे पठण करताना शांत एकाग्र चित्ताने स्पष्ट उच्चार करुन श्लोक म्हणावेत.
  • सर्वात शेवटी महादेवाची आरती करून सर्वांना चुर्म्याचा किंवा दूध अथवा खिरीचा प्रसाद वाटून पूजा संपन्न करावी.

“हर हर महादेव” जयघोष करून पूजा पूर्ण करावी.

 विशेष सूचना

  • बेलपत्र तीन पाने असलेले आणि स्वच्छ असावे.
  • शिवलिंगावर तुळस अर्पण करू नये.
  • मन शुद्ध आणि भावना पवित्र ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे.
  • उपवास केल्यास त्याचेही विशेष पुण्य मिळते.

महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने रुद्राभिषेक केल्यास भगवान शिवाची कृपा नक्की प्राप्त होते.

!! हर हर महादेव !!

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here