जोतिबाच्या नावानं चांगभलं…..

0
251
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

ज्योतिबा डोंगरावर दरवर्षी भरणाऱ्या चैत्र यात्रेची वेध गेल्या पंधरा दिवसापासूनच भाविकांना लागले होते. कामदा एकादशी पासून मानाच्या सासनकाठ्या कोल्हापुरात पंचगंगा घाटावर विसावा घेत पुढे डोंगराच्या दिशेचे मार्गस्थ होऊ लागल्या होत्या. शुक्रवारच्या रात्री महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात येथून आलेल्या पाच लाख भाविकांच्या उपस्थितीने जोतिबा डोंगर फुलून गेलाय. यात्रेसाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, देवस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे.

जोतिबा मंदिराच्या दिशेने जाणारा मार्ग फुलून गेला आहे. गुरुवार सकाळपासून खाजगी वाहने, एसटी-बस, बैलगाड्यांची वर्दळ सुरू होती. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी मार्गावर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. वाहनामध्ये बिघाड झाल्यास टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन तर्फे मोफत दुरूस्ती केली जात आहे. तसेच विविध सामाजिक संस्थामार्फत ताक,सरबत, पाणी वाटप केले जात आहे. यात्रेकरूंचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले आहेत.

यात्रेसाठी मानाच्या सासनकाठ्याचे पानाची विडा देऊन देवस्थान समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. साताऱ्यातील निनाम पाडळीची पहिली मानाची सासनकाठी गुरुवारी दाखल झाली. तर माऊचे विहीर (पाटण) कसबा डिग्रज (मिरज) आणि कसबा सांगाव (कागल) केवल (जि. सातारा) कवठेसार (जि.सांगली) रेठरे बुद्रुक साळुंखे (ता. कराड) यांच्या मानाच्या १०८ सासनकाठ्या सहभागी होतात. तसेच मान नसलेल्या आणि गावागावातून येणाऱ्या हजारो सासनकाठ्या सहभागी होत असतात ४५ सासनकाठ्या शनिवारी होणाऱ्या पालखी मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

या मिरवणुकीमध्ये २० फुटांपासून ते ७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. सासनकाठी खांद्यावर घेऊन चालणे आणि तोरण्या (दोर) सांभाळणे हे अतिशय कौशल्याचे काम असते. ही तोरणे संभाळण्याचा मान प्रमुख तीन तक्क्षिमा मधील घराण्यांचा असतो आणि ते लोक ही तीन तोरणे कोशल्याने हाताळतात. मानाच्या १०८ सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या असून चांगभलंच्या गजराने अवघा डोंगर दुमदुमून गेला आहे.

सर्व विधी झाल्यानंतर सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू होते. सासनकाठी म्हणजे नाथ केदाराचा विजय ध्वज. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या या पूर्वपार चाललेल्या परंपरेने आज ही हजारो सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर जातात. सासनकाठीस शासनकाठी असेही म्हणले जाते. सासनकाठी ही सुमारे ४० ते ४५ फूट उंचीचे जाड वेळुची (कळकाची) असते. हा कळक आणताना आणि निवडताना विशिष्ट प्रकारे पारख आणि पूजा विधी केला जातो. प्रत्येक सासनकाठीचे निशाण हे वेगवेगळे असते. हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो, त्यावेळेस देवस्थान कमिटीचे भालदार चोपदार फक्त संत नावजीनाथच्या किवळ काठीस पानाचा विडा देऊन आमंत्रण देतात आणि तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होतो.

मंदीर आवार ब पार्किंग स्थळे या ठिकाणी १४० कॅमेरे, मुख्य दर्शन रांगेत दोन मीटर डिटेक्टर दरवाजे, पार्किंग व डोंगर परिसर पाहण्यासाठी पाच ड्रोन कॅमेरा कार्यान्वित केले आहेत. गाभाऱ्यातील व आवारातील भाविकाच्या कृती नियंत्रणासाठी परिपूर्ण कॅमेरे बसविले आहेत. यात्रा घरबसल्या पाहण्यासाठी देवस्थानच्या सोशल मिडीयावरून थेट प्रक्षेपण होणार आहे. दर्शन मंडपात थेट प्रक्षेपणाचे सोय केलीआहे. शिंदे देवस्थान येथे पोलिसांसाठी स्वतंत्र सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, डी वाय पाटील विद्यापीठाच्या सोल्युशन विभागात विद्यार्थी भाविक संख्या, वाहतूक संस्थेची नोंद ठेवणार आहेत.

पहाटे चार वाजता – पाद्यपूजा काकड , आरती -पहाटे पाच वाजता, शासकीय महाभिषेक- सकाळी सात वाजता, महापूजा-दुपारी बारा वाजता, संध्याकाळी पाच वाजता नाथांची आरती होऊन नाथांची पालखी श्री यमाई देवीकडे प्रस्थान करते. नाथांच्या पालखी बरोबरच नाथांचा मानाचा घोडा, उंट, वाजंत्री, देव सेविकांच्या सर्व लवाजम्यासह सर्व पुजारी यासह सर्व भक्तजण यमाई मंदिराकडे जातात. दरम्यान पालखी चौथऱ्यावर थांबून विसावा घेतला जातो आणि सूर्यास्तानंतर हिलाल दिवटीच्या प्रकाशात नाथांची पालखी यमाई मंदिराकडे प्रस्थान करते आणि यमाई मंदिरासमोर सदरेवर नाथांची पालखी विराजमान होते. यानंतर जगदनीचे स्वरूप कट्यारीसोबत श्री यमाई म्हणजे रेणुका देवीचा विवाह सोहळा संपन्न होतो. विवाह सोहळा संपूर्ण झाल्यानंतर नाथांची पालखी परत मंदिराकडे प्रस्थान करते. प्रदक्षिणा करून नाथांची पालखी सदरेवर विराजमान होते आणि यानंतर तोफेची सलामी होऊन यात्रेची सांगता होते.

या ज्योतिबाच्या यात्रेसाठी राज्यभरातून लाखों भाविक दरवर्षी कोल्हापुरात येतात. यात्रेच्या निमिताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात. चैत्र यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते. सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात. भर उन्हात तरुण वर्ग, गुलालात चिंब होऊन नाचतो. सर्वांच्या मुखात ज्योतिबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर असतो. तर संपूर्ण डोंगर गुलाबी रंगानी रंगून गेलेला असतो. या यात्रेत भाविक, भक्त यासह देवस्थान समिती, पोलीस प्रशासन प्रत्येक जण देवाची सेवा बजावत असतात.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here