Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

 

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत अभिनेता-राजकारणी विजय थलपति यांच्या टीव्हीकेने द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पारंपरिक पक्षांना मोठा धक्का दिला. मात्र, सर्वात मोठा पक्ष ठरूनही टीव्हीकेला अद्याप सत्तास्थापनेचे निमंत्रण मिळालेले नाही. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या 118 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्याची अट घातल्याने राज्यातील राजकीय तणाव वाढला आहे.

विजय थलापति यांनी बुधवारी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. गुरुवार किंवा शुक्रवार शपथविधी होईल, अशी टीव्हीकेकडून तयारी करण्यात आली होती. चेन्नईतील नेहरू स्टेडियमवर समर्थकांची मोठी गर्दी होणार होती. मात्र, राज्यपालांनी स्पष्ट बहुमताचे पत्र मागितल्याने शपथविधी लांबणीवर पडला आहे.

टीव्हीकेने विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकल्या असून काँग्रेसच्या पाच आमदारांनी पक्षाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे टीव्हीके आघाडीचे संख्याबळ 113 वर पोहोचले आहे. मात्र, 234 सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी 118 आमदारांची गरज आहे. त्यात विजय थलपति दोन मतदारसंघांतून विजयी झाल्याने प्रत्यक्ष ताकद 107 मानली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.

दरम्यान, अण्णाद्रमुकमधील घडामोडींनी राजकीय चर्चांना आणखी वेग दिला आहे. पक्षाचे 47 पैकी 28 आमदार अचानक पुद्दुचेरीतील एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले आहेत. अण्णाद्रमुकमधील काही आमदार फुटून टीव्हीकेला पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे. या हालचालींचे नेतृत्व सी. व्ही. षण्मुगम करत असल्याचे बोलले जात आहे.

राज्यपालांच्या भूमिकेविरोधात कायदेशीर पर्यायांचा विचार करण्यास टीव्हीकेने सुरुवात केली असून पुढील काही दिवसांत तामिळनाडूच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.

तामिळनाडू विधानसभेतील पक्षीय बलाबल

पक्ष जागा
टीव्हीके  108
द्रमुक 59
अण्णाद्रमुक 47
काँग्रेस 5
इतर 8
एकूण 234

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here