कोल्हापूर : करवीर तालुक्यातील उचगावमध्ये स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये खर्चाच्या अंतर्गत रस्ते कामांचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. जय महाराष्ट्र ग्रुप ते क्लासिक ग्रुप तसेच एमटीएम मंगेश गल्ली या रस्त्यांच्या कामांचा यात समावेश आहे.
यावेळी महाडिक यांनी उचगावच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईंगडे यांना १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. काँक्रीटचे रस्ते केल्यामुळे पुढील १५ ते २० वर्षे रस्त्यांचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे त्यांनी सांगितले. केंद्र, राज्य तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता असल्याने विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, पंचायत समिती सदस्य तानाजी कांबळे, ग्रामपंचायत सदस्यांसह आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






