प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. योजनेशी संबंधित तक्रारी, शंका आणि अडचणी दूर करण्यासाठी 181 हा विशेष महिला हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
योजनेच्या e-KYC प्रक्रियेदरम्यान काही लाभार्थी महिलांकडून चुकून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने त्यांचा लाभ स्थगित झाल्याच्या तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तसेच इतर सर्व प्रकारच्या अडचणींचे फोन कॉलद्वारे तात्काळ निरसन करण्यासाठी 181 हेल्पलाईनवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. यासाठी संबंधित कॉल ऑपरेटर्सना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
अंगणवाडी सेविकांकडून प्रत्यक्ष पडताळणी
महाराष्ट्रातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव चुकीची माहिती भरली गेल्याचे निदर्शनास आल्याने, अशा लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हप्त्यांच्या विलंबावरून महिलांचा आक्रोश
दरम्यान, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 चा प्रत्येकी 1500 रुपयांचा हप्ता अद्याप न मिळाल्याने विदर्भातील भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये लाभार्थी महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर अखेरीस व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आला, तर डिसेंबर महिन्याचा लाभ 14 जानेवारीच्या सुमारास खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
महिलांनी योजनेशी संबंधित कोणत्याही अडचणीसाठी 181 या हेल्पलाईन क्रमांकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.





