पूर्ण वाढलेल्या झाडांभोवतीचे ट्रिगार्ड काढून पुनर्वापराची मागणी

0
35
Google search engine

कोल्हापूर : जयंती नाला ते खानविलकर पेट्रोल पंप या मार्गावरील पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांभोवती लावण्यात आलेले ट्रिगार्ड काढून त्यांचा शहरातील नव्याने लागवड केलेल्या रोपांसाठी पुनर्वापर करावा, अशी मागणी वर्ल्ड फॉर नेचर संस्थेच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे करण्यात आली आहे.या मार्गावरील अनेक वृक्षांची पूर्ण वाढ झाल्याने आता त्यांच्या संरक्षणासाठी ट्रिगार्डची आवश्यकता नसल्याचे संस्थेने निवेदनात म्हटले आहे. मात्र, हे ट्रिगार्ड अद्यापही त्याच ठिकाणी कायम आहेत. दुसरीकडे शहरातील नव्याने लागवड केलेल्या रोपांना संरक्षणासाठी ट्रिगार्डची गरज आहे. त्यामुळे उपलब्ध ट्रिगार्ड काढून त्यांचा पुनर्वापर केल्यास महापालिकेच्या साधनसामग्रीचा योग्य वापर होऊन नवीन ट्रिगार्ड खरेदीवरील अनावश्यक खर्च टाळता येईल, असे संस्थेने नमूद केले आहे.

महापालिकेने या मार्गावरील सर्व वृक्षांची पाहणी करून आवश्यक नसलेले ट्रिगार्ड तातडीने काढावेत, त्यांची नोंद ठेवून नव्याने लागवड केलेल्या रोपांसाठी त्यांचा वापर करावा, तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदारांना द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी याबाबत यापूर्वीही महापालिकेकडे तक्रार केली होती. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी ट्रिगार्ड कायम असल्याने संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here