गणेश मंडप तातडीने हटवा; प्रलंबित विकासकामांना गती द्या : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड

0
43
Google search engine

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिका कार्यालयात विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी विकासकामे, प्रशासकीय सुधारणा तसेच गणेशोत्सवानंतर शहरातील व्यवस्थापनाबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले.

सार्वजनिक गणेशोत्सव संपल्यानंतरही शहरातील रस्ते व चौकांमध्ये उभे असलेले गणेश मंडप तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व सहाय्यक आयुक्त व उपशहर अभियंत्यांनी आजच संबंधित भागांची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, तसेच मंडळांनी स्वतःहून मंडप काढून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.

‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह’ १ ऑक्टोबर २०२६ रोजी पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने बाहेरील सर्व प्रलंबित कामे ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. नाट्यगृहाच्या देखभालीसाठीची एजन्सीही आजच निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले.

घरफाळा, पाणीपट्टी, इस्टेट आणि परवाना विभागाच्या वसुलीचा नियमित साप्ताहिक आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांच्या रजेचे अधिकार संबंधित सहाय्यक आयुक्तांकडे सोपविण्यात आले आहेत.

पावसाळा संपल्याने निविदा व पूर्वप्रक्रिया पूर्ण झालेल्या विकासकामांना गती देण्याचे निर्देशही देण्यात आले. आचारसंहिता संपताच संबंधित कामांच्या वर्कऑर्डर तातडीने देऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

बायोमेट्रिक कार्डधारक कर्मचाऱ्यांसाठी क्यूआर कोड कॅम्प आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. केएमटी बसेसचे डॅशबोर्ड, ट्रायल आणि मार्ग निश्चितीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे, तसेच शहरातील सर्व मीटरच्या रीडिंगचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश विद्युत विभागाला देण्यात आले.

शहरातील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासोबतच विकासकामे, महसूल वसुली, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर महापालिका प्रशासनाचा भर असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here