कोल्हापूर : शहरातील वस्ती व झोपडपट्टी भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्यसेवा मिळावी, यासाठी सुरू असलेल्या फिरत्या दवाखान्यासाठी नवीन अद्ययावत वाहनाचे लोकार्पण नामदार चंद्रकांतदादा पाटील व अंजली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या फिरत्या दवाखान्यात डॉक्टर व सहाय्यकाची टीम कार्यरत असून, आठवड्यातील सहा दिवस १२ वस्ती भागांमध्ये सेवा दिली जाते. दररोज सुमारे १०० ते १२५ नागरिकांची मोफत तपासणी, उपचार, डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक औषधांचे वितरण केले जाते.
नवीन वाहनामुळे या आरोग्यसेवेचा विस्तार अधिक प्रभावीपणे करता येणार असून, आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांना घराजवळच आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे, अभय वंटे, यल्लाप्पा गाडीवडर आदी उपस्थित होते.






