कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी नविद हसनसो मुश्रीफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी चुये येथे गोकुळचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून त्यांनी आशीर्वाद घेतला. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या नव्या पर्वाला सुरुवात केली.
यावेळी बोलताना नविद मुश्रीफ यांनी दूध उत्पादकांचा विश्वास, दूध संस्थांचे बळ आणि सर्वांचे आशीर्वाद हीच आपली खरी ताकद असल्याचे सांगितले. दूध उत्पादकांच्या हितासाठी, दूध संस्थांच्या बळकटीकरणासाठी आणि गोकुळच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
दूध उत्पादकांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. त्यांच्या आशीर्वादाच्या बळावर ही निवडणूक लढणार असून, सर्वांनी साथ आणि आशीर्वाद कायम ठेवावा, असे आवाहन नविद मुश्रीफ यांनी केले.






