जनता दरबार नव्हे, निव्वळ दिखावा व फसवणूक – संजय पवार

0
31
Google search engine

कोल्हापूर : महसूल मंत्री बावनकुळे यांनी कोल्हापुरात जनता दरबार घेण्याची घोषणा केल्यानंतर आपल्या समस्या मांडण्यासाठी हजारो नागरिक दुपारी एक वाजल्यापासून उपस्थित होते. मात्र, महसूल मंत्री सायंकाळी 4.45 वाजता दाखल झाले. त्यानंतर गर्दी, घाईगडबड आणि ढकलाढकलीच्या वातावरणात निवेदने स्वीकारण्यात आली. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षांचा भ्रमनिरास झाला, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केली.

“हा जनता दरबार नव्हता, तर निव्वळ भेंडी बाजार होता. केवळ दिखावा आणि फसवणूक झाली,” असा आरोप पवार यांनी केला. महसूल विभागातील सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत होत नसून पैसा आणि वशिला असणाऱ्यांची कामे मात्र तातडीने केली जातात, असा आरोपही त्यांनी केला.महसूल विभागाच्या कार्यपद्धतीचे मागील दहा वर्षांचे ऑडिट केल्यास अनेक गैरप्रकार समोर येतील, असा दावा पवार यांनी केला. शासनाच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसुलाबाबतही गंभीर गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत त्यांनी या संपूर्ण यंत्रणेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

कोल्हापुरात वर्षानुवर्षे वशिल्याच्या जोरावर ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची बदली करून प्रामाणिक आणि सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. महसूल विभाग सक्षम आणि पारदर्शकपणे काम करू लागल्यास नागरिकांना आपल्या समस्या घेऊन मोठ्या संख्येने जनता दरबारात येण्याची वेळच येणार नाही, असेही संजय पवार यांनी म्हटले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here