Google search engine

प्रतिनिधी |दिग्विजय माळकर

राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असतानाच आजपासून म्हणजेच २५ मे २०२६ पासून ‘नवतपा’ला सुरुवात झाली आहे. हिंदू पंचांगानुसार सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, त्या काळाला नवतपा म्हटले जाते. २५ मे ते २ जूनदरम्यान असणारे हे नऊ दिवस वर्षातील सर्वात उष्ण दिवस मानले जातात.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये तापमान ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात २५ ते ३० मेदरम्यान उष्णतेच्या लाटा कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी तापमान ४५ ते ५२ अंश सेल्सिअसदरम्यान जाण्याची शक्यता आहे.

विज्ञानानुसार या काळात सूर्य कर्करेषेजवळ पोहोचत असल्याने सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर पडतात. त्यामुळे उष्णतेची तीव्रता वाढते. दरवर्षी मेच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीला नागरिकांना या प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतो.

विदर्भात तापमानाचा कहर

रविवारी विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, नागपूर, अकोला, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये तापमान ४४ ते ४५ अंशांच्या घरात होते.

सोमवारी अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत आठ जणांचा आकस्मिक मृत्यू झाला असून, हे मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आरोग्याचा वाढता धोका

नवतप्याच्या काळात उष्माघात, अशक्तपणा, डिहायड्रेशन, चक्कर येणे आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि उन्हात काम करणारे मजूर यांना याचा सर्वाधिक धोका असतो.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

  • दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे
  • बाहेर जाताना टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करावा

  • भरपूर पाणी, ORS, ताक, लिंबूपाणी यांसारखे द्रव पदार्थ घ्यावेत
  • हलका आणि पचायला सोपा आहार घ्यावा
  • जास्त वेळ उन्हात काम करणे टाळावे

नवतपा संपल्यानंतर वातावरणात बदल होण्यास सुरुवात होते आणि मोसमी पावसासाठी पोषक स्थिती तयार होते. त्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here