Google search engine
प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

नवी दिल्ली : गौतम अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्याविरोधातील अमेरिकेतील विविध तपास आणि संभाव्य खटले मागे घेण्यात आल्याची मोठी घडामोड समोर आली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) अदानींविरोधातील आरोप कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. वकिलांनी आरोप सिद्ध होण्याची शक्यता कमी असल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणात गौतम अदानी यांनी ६० लाख डॉलर, तर सागर अदानी यांनी १.२० कोटी डॉलर भरण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र, ही रक्कम भरताना कोणतेही गैरकृत्य केल्याची कबुली देणे किंवा आरोप नाकारणे त्यांच्यासाठी बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, इराणमधून एलपीजी आयात करून अमेरिकी निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोपही अमेरिकेच्या अर्थ विभागाच्या ‘ऑफिस ऑफ फॉरेन ॲसेट्स कंट्रोल’ (OFAC) ने मागे घेतला आहे. या प्रकरणात अदानी समूहाने तपासात व्यापक सहकार्य करण्याचे मान्य केले असून, काही माहिती स्वेच्छेने सादर केली आहे. तसेच, २७.५० कोटी डॉलर भरण्यासही समूहाने संमती दिली आहे.

यामुळे गौतम अदानी, सागर अदानी आणि अदानी ग्रुप  यांच्याविरोधात अमेरिकेत सुरू असलेले विविध नियामक आणि कायदेशीर तपास गेल्या दोन-तीन दिवसांत बंद करण्यात आल्याचे समजते. याआधी गेल्या आठवड्यात U.S. Securities and Exchange Commission (SEC) ने सौरऊर्जा प्रकल्पाशी संबंधित प्रकरणात अदानींविरोधातील कायदेशीर कारवाई थांबवली होती.

या घडामोडींवरून राजकीय वातावरणही तापले आहे.संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत, “गौतम अदानींविरोधातील खटले काढून घेण्यात आले. हे सर्व सरकारच्या गैरमार्गाने आणि दबावामुळे झाले आहे,” असा आरोप केला. तसेच, “सत्तेच्या प्रभावाचा वापर करून उद्योगपतींना संरक्षण दिले जात आहे,” असा दावा त्यांनी केला.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here