प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात उमेदवारीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने ठाकरे यांनाच उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली जात असली तरी ते स्वतः निवडणूक लढवण्यास फारसे इच्छुक नसल्याची माहिती समोर येत आहे.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक, तर एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे.
विधानसभेतील संख्याबळानुसार या निवडणुकीत भाजपला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Sharad Pawar faction) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
यांनी ठाकरे यांच्या उमेदवारीस पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
मात्र, ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यास पक्षातील इतर नेत्यांना संधी मिळू शकते. त्यासाठी अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, राजन विचारे, वैभव नाईक आणि सूरज चव्हाण या नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
दरम्यान, विधान परिषदेतील काही सदस्यांचा कार्यकाळ संपत असून त्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे गटाचा अंतिम निर्णय काय असेल, याकडे महाविकास आघाडीसह राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.
विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार
- उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा)
- नीलम गोऱ्हे (शिवसेना)
- शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
- अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
- गोपीचंद पडळकर (भाजप)
- रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
- राजेश राठोड (काँग्रेस)
- प्रवीण दटके (भाजप)
- रमेश कराड (भाजप)
विधान परिषदेची पोटनिवडणूक
- प्रज्ञा सातव
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचे वेळापत्रक
- अधिसूचना: 23 एप्रिल 2026
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल
- अर्जांची छाननी 2 मे
- अर्ज मागे घेण्याची मुदत 4 मे
- मतदान: 12 मे (सकाळी 9 ते सायं 4)
- मतमोजणी: 12 मे संध्याकाळी 5 वाजता






