Google search engine

प्रसारमाध्यम l प्रतिनिधी 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कोल्हापूर आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय. एस. टी.ई.),नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा ‘इंपल्स 2026’ विविध पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल 700 स्पर्धकांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपन्न झाली. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. सर्व सहभागींना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी आणि इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. समन्वयक प्रा. अनिस नदाफ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना संचालक भिर्डी म्हणाले, “प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर अभिनव उपाय शोधणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, नवकल्पनांना चालना देणे आणि त्यांच्या तांत्रिक कौशल्यांना योग्य दिशा देणे यासाठी ‘इंपल्स‘सारख्या स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक असते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या सादरीकरण कौशल्यात, संवादकौशल्यात तसेच आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होते.

प्राचार्य डॉ. सपाटे म्हणाले ,” विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि चिकित्सक विचार करण्याच्या कौशल्यांना चालना देण्यासाठी अभियांत्रिकी क्षेत्रात तांत्रिक स्पर्धांचे महत्त्व अत्यंत मोठे आहे.या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग कसा करायचा हे शिकायला मिळते आणि टीमवर्क, संवाद कौशल्ये विकसित होतात”
या स्पर्धेमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ग्रुप, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ग्रुपमधील अत्याधुनिक तांत्रिक विषयांवर स्पर्धकांनी पेपर प्रेझेंटेशन केले तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी मॉडेल मेकिंग स्पर्धेमध्ये विविध प्रतिकृती तयार केल्या. क्विझ कॉम्पिटिशन, पोस्टर प्रेसेंटेशन , सर्किट मॅनिआ , कोडवार, इनोवेशन आयडिया पिच स्पर्धेत स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेचे नेटके नियोजन, उत्तम भोजन व्यवस्था, आकर्षक बक्षिसे, विविध विषयांवरील माहितीचे आदान प्रदान यांची संधी मिळाल्यामुळे सहभागी स्पर्धकांनी समाधान व्यक्त केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शन मिळाले. याप्रसंगी तज्ञ परीक्षक, सहभागी स्पर्धक, विद्यार्थी , विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेचे समन्वयक प्रा. डॉ. राजेंद्र भोसले यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. सुदर्शन महाडिक यांनी केले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here