मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाने ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘ साठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीला विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवून देण्यात ही योजना निर्णायक ठरली होती. महिला व बालविकास विभागाकडून चालवली जाणारी ही योजना राज्यातील महिलांसाठी आर्थिक आधार बनली आहे.
या योजनेबाबत सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सर्व लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देत ही प्रक्रिया सुरू केली जात आहे आणि येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत सर्व पात्र महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.
ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी ?
-
अधिकृत पोर्टलला भेट द्या : लाभार्थींनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया सुरू करावी.
-
महत्त्वाची माहिती अपलोड करा : नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती पोर्टलवर अपलोड करावी लागेल.
-
आधार क्रमांक नोंदवा : लाभार्थी आधार क्रमांक पेजवर नोंदवावा.
-
कॅप्चा कोड आणि प्रमाणीकरण : कॅप्चा कोड अचूक नोंदवा आणि आधार प्रमाणीकरणासाठी ‘मी सहमत आहे’ पर्याय निवडा.
-
ओटीपी प्रमाणीकरण : आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी नोंदवा आणि प्रक्रिया पूर्ण करा.