कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
केंद्र सरकारच्या “पी.एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजना” अंतर्गत आता सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून सौरऊर्जा वापर अधिक व्यापक करण्यात येणार आहे. या योजनेबाबत कोल्हापूर शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी, संचालक व सभासदांसाठी सोमवारी १४ जुलैला दुपारी २ वाजता जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, टाकाळा, कोल्हापूर येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपनिबंधक डॉ. प्रिया दळणकर यांनी दिली.
या शिबिरात महावितरणचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव पी.एम. सूर्यघर रूफ टॉप सोलरायझेशन योजनेची सविस्तर माहिती देणार आहेत. डॉ. दळणकर यांनी सांगितले की, या योजनेतून देशभरात एक कोटी घरांना सौरऊर्जेसाठी अनुदान देण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने निश्चित केले असून, त्यासाठी निवडलेल्या १०० शहरांमध्ये कोल्हापूरचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रातील ४५ शहरांपैकी कोल्हापूर हे एक प्रमुख शहर ठरले आहे.
शहरातील ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांकडे रूफ टॉप सोलर यंत्रणा बसवण्यासाठी पुरेशी जागा आहे, अशा संस्थांची निवड प्राधान्याने केली जाणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार विभाग, ऊर्जा विभाग व कोल्हापूर जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा संघ एकत्रितपणे काम करत आहेत.
कोल्हापूर शहरामध्ये सध्या ३११ सहकारी गृहनिर्माण संस्था कार्यरत आहेत. शहरातील सौरऊर्जा निर्मितीस अनुकूल वातावरण लक्षात घेता, अधिकाधिक संस्थांनी या योजनेत सहभागी होऊन विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन उपनिबंधक डॉ. दळणकर यांनी केले आहे.
या मार्गदर्शन शिबिरात कोल्हापूर जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा संघ मर्या. चे अध्यक्ष एस. टी. जाधव व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींनी या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही डॉ. दळणकर यांनी केले आहे.
——————————————————————————————-